मालवण आयटीआयच्या तत्कालीन प्राचार्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 17:34 IST2021-06-02T17:32:37+5:302021-06-02T17:34:20+5:30
Crimenews Sindhudurg : हाऊसबोट बांधणी आणि स्पीडबोट खरेदी प्रकरणात सुमारे ९९ लाख २८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मालवण आयटीआयचे तत्कालीन प्राचार्य उदय सीताराम चव्हाण (५४, रा. कुंवारबाव, ता. जि. रत्नागिरी) यांना मालवण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

मालवण आयटीआयच्या तत्कालीन प्राचार्यांना अटक
मालवण : हाऊसबोट बांधणी आणि स्पीडबोट खरेदी प्रकरणात सुमारे ९९ लाख २८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मालवण आयटीआयचे तत्कालीन प्राचार्य उदय सीताराम चव्हाण (५४, रा. कुंवारबाव, ता. जि. रत्नागिरी) यांना मालवण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची तीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.
याबाबतचा गुन्हा १ डिसेंबर २०१९ रोजी मालवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तब्बल १७ महिन्यांनंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
दुसरा संशयित अटकेत
रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी अजित पोपट शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जगन्नाथ महादेव कद्रेकर आणि उदय सीताराम चव्हाण यांच्या विरोधात फसवणूक, अपहार यांसारख्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल होते. याप्रकरणातील दुसरा संशयित जगन्नाथ कद्रेकर याला यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे.
मालवण येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शैक्षणिक दर्जा वाढवून नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, संस्थेस लागणारी यंत्रसामग्री खरेदी करणे व आवश्यकतेनुसार साहित्य खरेदी करणे यासाठी टीजीईटी नवी दिल्ली यांच्याकडून पीपीपी अंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपये मॅनेजमेंटची कमिटी आयटीआय मालवण यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती.