Sindhudurg: निवती रॉक्सजवळील पाणबुडी प्रकल्प अनास्थेमुळे रखडला, आता हीच संकल्पना गुजरात राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:39 AM2023-12-28T11:39:08+5:302023-12-28T11:40:13+5:30

राणे, चव्हाण यांच्याकडे जिल्हावासियांचे लक्ष

The submarine project near Nivati ​​Rocks in Sindhudurg stalled due to apathy, Now Gujarat will implement the same concept | Sindhudurg: निवती रॉक्सजवळील पाणबुडी प्रकल्प अनास्थेमुळे रखडला, आता हीच संकल्पना गुजरात राबविणार

Sindhudurg: निवती रॉक्सजवळील पाणबुडी प्रकल्प अनास्थेमुळे रखडला, आता हीच संकल्पना गुजरात राबविणार

संदीप बोडवे

मालवण: सिंधुदुर्गच्या पर्यटनाला लागलेले अनास्थेचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दहा पंधरा वर्षात सी वल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठी विराट युद्धनौका, अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचे गाजर सिंधुदुर्गवासियांना दाखविण्यात आले. परंतु दुर्दैवाने यातील एकही प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. 

२०१८ साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग मधून घोषणा करण्यात आली होती. निवती रॉक्स जवळील समुद्रात पाण्याखालील अंतरंग न्याहळण्याची या प्रकल्पात योजना होती. आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्राची पाणबुडी गुजरात मध्ये प्रगटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत..

समुद्राखालचे अंतरंग दाखविणारा प्रकल्प..

 भारताच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनासाठी पाणबुडीची संकल्पना पहिल्यांदाच मांडण्यात आली होती. या प्रकल्पासाठी ५६ कोटी निधी मंजूर झाला तर त्यातील काही निधी वितरितही झाला होता. मात्र वेळोवेळी बदलणारे मंत्री, बदलते सचिव आणि वर्षाला बदलणारे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक या गोंधळामुळे सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे. 

कसा होता पाणबुडी प्रकल्प..

सिंधुदुर्गात साकारला जाणारा पाणबुडी प्रकल्पात कर्मचाऱ्यांसह २४ प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून न्याहाळता येणार होती. या प्रकल्पामुळे पहिल्या वर्षी ५ हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तर १०० ते १५० कोटींची उलाढाल होणार होती. प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. 

पर्यटनात नव्या संकल्पना, नवे आकर्षण कधी आणणार..

सिंधुदुर्गात मागील दहा पंधरा वर्षात पर्यटन वाढीसाठी नव्याने एकही संकल्पना राबविण्यात आली नाही. किंवा कोणतेही नवे पर्यटन आकर्षण निर्माण केले नाही. सरकारे बदलत असली तरीही जिल्ह्यातील नेतृत्वांनी पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला नाही. 

नेमकी अडचण कुठे आली, जिल्हावासियांना उत्तर द्यावे लागणार..

पाणबुडी प्रकल्पामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये जिल्ह्याचे नाव देश पातळीवर वर गेले असते. परिणामी सिंधुदुर्गमध्ये उच्च दर्जाचे पर्यटन प्रस्थापित झाले असते. जिल्ह्यातील इतर किनारपट्टीवर पर्यटन वाढीस लागले असते. या प्रकल्पाची संकल्पना, अहवाल आणि निधीची तरतूदही करण्यात आली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या, याचे राज्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. 

राणे, चव्हाण द्वयींवर भिस्त..

जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी धडाडीने काम करण्यास प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकताच नौदल दिन यशस्वी करून दाखविला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या द्वयींनी सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पात लक्ष घातला तरच हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो. अन्यथा गुजरातच्या स्वप्नांमध्येच धन्यता मानण्याची वेळ सिंधुदुर्ग वासियांवर येणार आहे. 

महाराष्ट्राची संकल्पना गुजरात साकारते..

गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवित आहेत. जानेवारीत व्हायब्रंट गुजरात समिट मध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे. समुद्रात ३०० फूट खोल जाऊन पर्यटकांना समुद्रात बुडलेल्या द्वारका शहराच्या अवशेषांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

Web Title: The submarine project near Nivati ​​Rocks in Sindhudurg stalled due to apathy, Now Gujarat will implement the same concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.