सावंतवाडी कारागृहाची जुनी संरक्षक भिंत कोसळली, कैद्यांना ओरोस कारागृहात हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:11 IST2025-07-05T15:10:29+5:302025-07-05T15:11:12+5:30

चार महिन्यांपूर्वी केले होते बांधकाम

The old protective wall of Sawantwadi Jail collapsed, prisoners will be shifted to Oros Jail | सावंतवाडी कारागृहाची जुनी संरक्षक भिंत कोसळली, कैद्यांना ओरोस कारागृहात हलविले

सावंतवाडी कारागृहाची जुनी संरक्षक भिंत कोसळली, कैद्यांना ओरोस कारागृहात हलविले

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थानकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या सावंतवाडीतील जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत शुक्रवार सकाळी कोसळली. सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही; मात्र, दगडी बांधकामावर सिमेंटचे बांधकाम केल्यामुळे भिंतींची कमकुवतपणा वाढल्याचा आरोप सर्वस्तरावर होत आहे.

कोसळलेली भिंत पूर्णपणे संस्थानकालीन असून, या इमारतीला सुमारे २५० वर्षांचा इतिहास आहे. ती मूळ दगडी बांधकामाची आहे, परंतु अलीकडच्या काळात भिंतीवर चिरे व सिमेंटचे बांधकाम करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांचा असा दावा आहे की, सिमेंटच्या या कामामुळे मूळ दगडी भिंत कमकुवत झाली आणि त्यामुळे ती शुक्रवारी कोसळली आहे.
भिंत कोसळल्याने कारागृहाच्या चारही बाजूंच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून, तेथे असलेल्या कैद्यांना तातडीने ओरोस येथील सुरक्षित कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी दिली आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी केलेल्या कामांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोरात केली जात आहे.

सार्वजनिक बांधकामाच्या कामावर प्रश्नचिन्ह

कारागृहाची भिंत अवघ्या चार महिन्यात कोसळल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित आहेत. काळ्या दगडांवर चिऱ्याची भिंत कशी बांधली गेली, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी आराखडा कसा तयार केला यावरही प्रश्न उभे आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

ठेकेदाराचे बोगस काम समोर आले आहे. सार्वजनिक बांधकामामुळे ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होत असून, या प्रक्रियेत केवळ ठेकेदार आणि मिलीभगती असणाऱ्यांचे पोट भरले जात आहे. जनतेचा पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च केला जात आहे. विकासाच्या उद्देशाने अधिकारी व लोकप्रतिनिधी काम करत नाहीत. संबंधित ठेकेदार आणि जबाबदारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.– रूपेश राऊळ (विधानसभा मतदारसंघ प्रमुख, उद्धवसेना)

Web Title: The old protective wall of Sawantwadi Jail collapsed, prisoners will be shifted to Oros Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.