Hapus Mango Market: फळांचा राजा बाजारात दाखल, दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडहून हापूसची पहिली पेटी वाशीला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:07 IST2025-10-20T19:06:04+5:302025-10-20T19:07:26+5:30
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ

Hapus Mango Market: फळांचा राजा बाजारात दाखल, दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडहून हापूसची पहिली पेटी वाशीला रवाना
देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ६ डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली. यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, पहिल्या पेटीचा मान शिरसेकर यांना मिळाला.
पडवणे गावातील शिरसेकर यांच्या बागेत जुलै महिन्यात तीन ते चार कलमांना आगाऊ मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व फवारणीमुळे त्या कलमांवर सुमारे पाच पेट्यांइतकी फळधारणा झाली. त्यापैकी पहिली पेटी त्यांनी आज, सोमवारी (दि २०) वाशी मार्केटकडे रवाना केली.
वाशी येथील नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालमार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून, विक्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील दलालवर्गाकडून सांगण्यात येत आहे.
याआधीही, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता. मात्र, यावर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून विक्रमी प्रारंभ केला आहे.
कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिल्याच बागायतदार ठरले असून, उद्याच्या विक्रीदरम्यान या आंबापेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे.