सिंधुदुर्ग: खारेपाटण येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, अद्याप पटली नाही ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:25 IST2022-09-23T16:22:06+5:302022-09-23T16:25:38+5:30
शुक नदीच्या पात्राच्या शेजारी आढळून आला मृतदेह

सिंधुदुर्ग: खारेपाटण येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, अद्याप पटली नाही ओळख
संतोष पाटणकर
खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथे चिंचवली रोडला शुक नदीच्या पात्राच्या शेजारी एका ३० ते ४० वयोगटातील एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप ओळख पटली नाही.
खारेपाटण येथे आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास खारेपाटण - चिंचवली रोडला शुक नदीच्या पात्राशेजारी शेरणीच्या झाडीत एका ३० ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह नदीत मासेमारी करणाऱ्या घोरपी बांधवांना आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांना दिली. राऊत यांनी तातडीने पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना घटनेची माहिती देताच त्यांनी पोलिसांना कळवले. माहिती मिळताच खारेपाटण पोलीस स्टेशन दुरशेत्राचे हवालदार उद्धव साबळे, पोलीस शिपाई पराग मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली.
मात्र, मृतदेह हा सडलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील खारेपाटणला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.