Sindhudurg: घरासमोरील व्हरांड्यात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह, पोलिस तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:31 IST2025-03-01T16:31:21+5:302025-03-01T16:31:59+5:30
गुन्हेगारी पार्श्वभूमी

Sindhudurg: घरासमोरील व्हरांड्यात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह, पोलिस तपास सुरु
कुडाळ : तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदीप ऊर्फ बाळा दामोदर करलकर (५२), या युवकाचा राहत्या घरातच खून करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. गावात पोलिसांकडून खुन्ह्याचा तपास सुरू असून खुनाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कुडाळ तालुक्यातील कवठी-अन्नशांतवाडी ही अतिदुर्गम भागात वसलेली वाडी आहे. दहा ते बारा घरं असलेली ही छोटीशी वाडी असून या वाडीत संदीप करलकर आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. अलीकडे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या आईला अपंगत्वाचा झटका आल्यामुळे वडिलांचे दिवस-कार्य आटोपल्यानंतर मृत संदीप करलकर यांच्या छोट्या भावाने आपल्या आईला उपचारासाठी मुंबईला नेले होते. त्यामुळे मृत संदीप करलकर एकटाच घरी राहत होता. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्याचा कुटुंबातील सदस्यांना सुद्धा त्रास होत होता. त्यामुळे तपासानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार आहे. मृत करलकर याच्या पश्चात आई,भाऊ, पुतण्या असा परिवार आहे.
पोलिसांना फोन
दरम्यान, शुक्रवारी संदीप करलकरचा खून झाल्याचा फोन निवती व कुडाळ पोलिसांना गेला. त्या माहितीच्या आधारे निवती व कुडाळ पोलिसांनी येथे धाव घेतली. तत्पूर्वी संदीप करलकर यांचा मुंबई येथे राहत असलेला भाऊ संतोष करलकर आईचे आधारकार्ड घेऊन जाण्यासाठी पुतण्यासमवेत घरी आला. त्याला हा प्रकार निदर्शनास आला.
पोलिसांकडूनही दुजोरा
पोलिसांची टीमही मृत संदीप करलकर यांच्या घरी दाखल झाली. घरातील समोरच्या व्हरांड्यात रक्तबंबाळ अवस्थेत संदीप करलकरचा मृतदेह पडला होता. घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू करुन हा खून असल्याचे सांगितले.
खुन्यांचा अद्याप तपास लागला नाही. आम्ही योग्य तपास करून लवकरच त्या खुन्यापर्यंत पोहोचू. संदीप करलकर याचे कोणाशी संबंध आले होते. त्याचा नेमका खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला. याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. - विनोद कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, सावंतवाडी