Sindhudurg: ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला, पोलिस तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:41 IST2025-04-16T15:41:08+5:302025-04-16T15:41:57+5:30

शेजारी राहणारा सहकारी सुटीवरून परतल्यावर घटना झाली उघड

The body of a rural hospital clerk was found in a decomposed state in Sindhudurg, police investigation has begun | Sindhudurg: ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला, पोलिस तपास सुरु

Sindhudurg: ग्रामीण रुग्णालयाच्या लिपिकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला, पोलिस तपास सुरु

वैभववाडी : ग्रामीण रुग्णालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सखाराम धर्मा वाझे (५२) मृतावस्थेत शासकीय निवासस्थानात आढळले. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सोमवारी (दि.१४) रात्री ही घटना उघड झाली. दरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

येथील ग्रामीण रुग्णालयात सखाराम वाझे हे लिपिक पदावर कार्यरत होते. रुग्णालयाशेजारीच शासकीय कर्मचारी निवासस्थानात (क्वॉर्टर्स) ते राहत होते. शुक्रवारी ते आपली ड्युटी संपवून निवासस्थानी गेले होते. त्यानंतर ते दोन दिवस कोणालाही दिसून आले नव्हते. दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणारे सहकारी सोमवारी रात्री सुटीवरून परतले. तेव्हा त्यांना बाजूला वाझे राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. या खोलीला आतून कडी होती. त्या कर्मचाऱ्याने वाझे यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला, मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही.

ही बाब त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सांगितली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत त्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी वाझे यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. या प्रकाराची माहिती पोलिसांनी नातेवाईकांना दिली. त्यामुळे मंगळवारी(ता.१५) सकाळीच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर शवविच्छेदन करुन सायंकाळी मृतदेह ताब्यात देण्यात आला.

मूळचे पुणे सिन्नर येथील रहिवासी

वाझे हे मूळचे सिन्नर-पुणे येथील राहणारे होते. ते गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पदोन्नती झाली होती. मात्र, व्यसनामुळे त्यांची कारकीर्द अनेकदा वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: The body of a rural hospital clerk was found in a decomposed state in Sindhudurg, police investigation has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.