प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:38 IST2025-11-22T12:37:59+5:302025-11-22T12:38:44+5:30
भाजपाचे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे योग्य पद्धतीने उभारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका आहे.

प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण
मालवण: कार्यकत्यांच्या मागणीनुसार भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली, हे आमदार नीलेश राणेचे विधान चुकीचे आहे. महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे पहिल्यांदा उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आम्ही अखेरपर्यंत महायुती होण्याच्यादृष्टीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवरीवर निर्णय घेतला नव्हता. शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्याकडे पर्याय राहिला नाही. असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले. भाजपा कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपाचे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे योग्य पद्धतीने उभारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका आहे. असे काहींचे विधान आहे हे विधान पूर्णत: चुकीचे आहे. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या सर्व कोकणचे नेतृत्व खासदार नारायण राणे यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करीत होते. त्यावेळी रवींद्र चव्हाण पालकमंत्री होते. ते कायमच युतीसाठी आग्रही राहिले. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीला लोकसभेलाही मोठा विजय मिळवला याचीही आठवण प्रभाकर सावंत यांनी करून दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेत असताना त्यांनी म्हटले होते की, स्थानिक पातळीवर त्यांनी या सगळ्याचा विचार करा. अडचण आल्यास प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधा, असे सांगितले होते. त्यानुसार सिंयुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रक्रिया सुरु झाल्यानंतर खासदार नारायण राणे जिल्हयात आले. त्यांनी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली.
मालवणमध्ये भाजपचे १३ नगरसेवक होते. या जागांसह नगराध्यक्ष पदासाठी भाजप आग्रही होता. त्यातून परत शिंदे सेनेची नगराध्यक्ष पदाची देखील मागणी होती. त्यांना बारापेक्षा जास्त जागा हव्या होत्या. या सगळ्यांचा समन्वय साधने अवघड असल्याने येथील सर्व स्थिती आपण प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचविली.
एकट्या रवींद्र चव्हाण यांनी युती तोडली असे होत नाही. शिंदेसेनेने आपला नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार जाहीर केला. आम्ही ही सगळी प्रक्रिया शेवटच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करणार होतो प्रस्ताव सर्व कार्यकर्त्यांना समाधान देणारा असता, तर हा सगळा विषय सुटला असता सेनेची जास्त जागांची मागणी होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर याचे संतुलन राहिले नाही.
पालकमंत्री नीतेश राणे यानी पण म्हटले होते की, भाजपकडे कार्यकर्त्यांचा एवढा मोठा संच आहे. उमेदवारीसाठी एवढी दावेदारी आहे. त्यासाठी बंडखोरी होऊन महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल. आणि आता काही अंशी ही गोष्ट खरी ठरली. भाजप पक्षामध्ये असलेले आणि तयार झालेले उमेदवार सुद्धा महाविकास आघाडीने घेऊन त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार बनविले. या सर्व गोष्टीचा विचार करून प्रदेशाध्यक्षांकडे प्रस्ताव देण्यात आला होता. असे सावंत यांनी स्पष्ट केले.