पडळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, कुडाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 19:05 IST2020-06-26T19:02:12+5:302020-06-26T19:05:22+5:30
राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारीत तो जाळला. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन करणाºया १६ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला अमित सामंत, सुनील भोगटे, भास्कर परब, संग्राम सावंत यांनी जोडे मारून आंदोलन छेडले.
कुडाळ : राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारीत तो जाळला. तसेच त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हे आंदोलन करणाºया १६ जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
शरद पवार म्हणजे देशाला लागलेला कोरोना असे वक्तव्य भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सकाळी कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालय ते हॉटेल आरएसएन येथील महामार्गापर्यंत पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच जोडो मारो आंदोलन छेडत पुतळा जाळून त्यांच्या वक्तत्वाचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, कुडाळ शहराध्यक्ष संग्राम सावंत, सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटकर, युवक शहर अध्यक्ष हेमंत कांदे, कुडाळ तालुका अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नजीर शेख, अल्पसंख्याक कुडाळ शहर अध्यक्ष हमीद शेख, बाळ कनयाळकर, साबा पाटकर, कादर खान, बशीर खान, शिराज शहा, इब्राहिम शहा या सर्वांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत कुडाळ पोलीस ठाण्यात आणले.
यावेळी अमित सामंत यांनी सांगितले की, आमचे नेते शरद पवार यांच्यावर बोलण्याची पडळकरांची लायकी नाही. शरद पवार यांची लोकनेता म्हणून ओळख आहे. अशा नेत्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचे म्हणाले.
त्यांनी योग्यता तपासावी
एकही निवडणूक न जिंकलेल्या पडळकर यांनी आपले राजकीय वय आणि योग्यता तपासून पहावी. शरद पवार हे जेवढी वर्षे राजकारणात आहेत तेवढे पडळकर यांचे वयदेखील नाही. त्यामुळे पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर बोलताना कोणाविरुद्ध बोलतो याचे भान ठेवावे व पडळकर त्यांनी आपल्या गल्लीपुरते राजकारण करावे, असा टोलाही लगावला.