पाईपलाईन खोदाईचे काम थांबवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:32 IST2019-12-23T15:29:17+5:302019-12-23T15:32:18+5:30
बांदा-शिरोडा मार्गावर सुरू असलेले पाईपलाईन खोदाईचे धोकादायक काम शुक्रवारी ग्रामस्थांनी रोखले होते. याविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

पाईपलाईन खोदाईचे काम थांबवाच
बांदा : बांदा-शिरोडा मार्गावर सुरू असलेले पाईपलाईन खोदाईचे धोकादायक काम शुक्रवारी ग्रामस्थांनी रोखले होते. याविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
मडुरा ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत ते धोकादायक काम थांबविण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच ते काम प्रशासनाचे नियम डावलून सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. मात्र, बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या दोडामार्ग-हेदूस ते वेंगुर्ला असे पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकल्पांचा मडुरा गावाला लाभ होणार असल्याने प्रशासनाचे सहकार्य असल्याचे सरपंच साक्षी तोरसकर यांनी सांगितले.
यावेळी सदस्या माधुरी वालावलकर म्हणाल्या की, पाईपलाईन खोदाईची हद्द बांधकाम विभागाने आखून दिली आहे. त्याप्रमाणे काम होत नाही. रस्त्यापासून निदान पाच फुटांवर खोदाई अपेक्षित असून रस्त्याला लागूनच खोदाई केल्याने पूर्ण रस्ता धोकादायक बनला आहे. ज्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून काम अपेक्षित आहे त्याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदाई केल्याने रस्ता धोकादायक बनल्याचे बाळू गावडे म्हणाले.
उपसरपंच विजय वालावलकर यांनीही या कामाबाबत आक्षेप घेतला. यावेळी सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, सदस्य माधुरी वालावलकर, स्वाती परब, शशिकांत परब, सखाराम परब, सानिका वेंगुर्लेकर, साक्षी परब, माजी उपसरपंच उल्हास परब, ग्रामकमिटी माजी अध्यक्ष दिलीप परब यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पुन्हा बैठक बोलविणार
शेवटी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमजीपी कंपनी अधिकारी व ग्रामस्थांची पुन्हा एकदा मंगळवार २४ रोजी बैठक बोलविण्याचे ठरविण्यात आले.