Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:49 IST2024-12-28T13:48:56+5:302024-12-28T13:49:28+5:30
धडकेत नळयोजनेची पाइपलाइन फुटली

Sindhudurg: धाराशिव येथील सहलीच्या एसटीला देवगडमध्ये अपघात, चार विद्यार्थी जखमी
देवगड (जि. सिंधुदुर्ग) : धाराशिव येथून शैक्षणिक सहलीसाठी सिंधुदुर्गात आलेली एसटी बस खाकशीमार्गे कुणकेश्वरकडे जाताना खाकशी शाळेजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली जाऊन नळयोजनेच्या पाइपलाइनला धडकली. अपघातात चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.
बसमध्ये ४४ विद्यार्थी व ४ शिक्षक असे एकूण ४८ जण होते. मात्र, बसमधील चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच, स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. देवगड आगार व्यवस्थापक यांनी तत्काळ देवगड आगाराच्या बसची आणि चालकाची व्यवस्था करून शालेय सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सहलीच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले.
धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसने देवगडमध्ये आली होती. दुपारी मिठमुंबरी येथे जेवण करून ही सहल खाकशीमार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र, खाकशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड यांचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी डाव्या बाजूला पाच फूट खाली गेली.
सुदैवाने झाडेझुडपे आंबा बागायत व देवगड नळयोजनेची पाइपलाइन असल्याने त्या पाइपलाइनला जाऊन धडकली. मात्र, एसटीच्या धडकेने पाइपलाइन फुटून पाणी रस्त्यावर आले. अपघाताची भीषणता एवढी होती की, पाइपलाइनचे दोन तुकडे झाले आणि नळयोजनेच्या जॉइंटला तडे गेले आहेत.