Sindhudurg: थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघे ठार; चायनीज आणण्यासाठी जाताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:39 IST2025-08-19T16:39:00+5:302025-08-19T16:39:26+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर बेळणे येथे अपघात

Speeding bike hits parked truck on Mumbai Goa highway Two killed | Sindhudurg: थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघे ठार; चायनीज आणण्यासाठी जाताना झाला अपघात

Sindhudurg: थांबलेल्या ट्रकला दुचाकीची धडक, दोघे ठार; चायनीज आणण्यासाठी जाताना झाला अपघात

कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथून हुंबरटला जात असलेल्या भरधाव दुचाकीची मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद फरहान मीर (वय १९) व शाहीद इरफान शेख (२३, दोन्ही रा. हुंबरट, मुस्लीमवाडी) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले.

जैद व शाहीद हे दोघे चायनीज आणण्यासाठी होंडा शाईन दुचाकी घेऊन रविवारी रात्री नांदगावला गेले होते. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे त्यांनी रेनकोट घातला होता. त्यांचा एक मित्र रेनकोट नसल्याने त्यांच्यासोबत गेला नाही. त्यामुळे तो अपघातापासून वाचला.
त्या दोघांनी आपल्या घरात कणकवली येथे जातो, असे सांगितले होते. मात्र, ते नांदगाव येथे गेले.

तेथून परतत असताना बेळणे येथे अंधारात महामार्गानजीक उभ्या असलेल्या एका ट्रकचा अंदाज न आल्याने या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी त्या दोन्ही युवकांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचे स्पष्ट झाले.

या अपघातात दुचाकीच्या दर्शनीभागाचा चक्काचूर झाला. त्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने चालक विठ्ठल शिवाप्पा झिपरे (रा. चिकोडी, बेळगाव) याने महामार्गाच्या बाजूला तो रविवारी दिवसभर उभा करून ठेवला होता.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी अपघातस्थळ गाठून पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाइकांचे जबाब घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश सावंत, उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार चंद्रकांत झोरे, अरविंद जाधव तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघाताची माहिती पोलिसांना सलीम उस्मान सय्यद यांनी दिली.

Web Title: Speeding bike hits parked truck on Mumbai Goa highway Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.