Sindhudurg: बुडणाऱ्या पित्याला वाचविण्यासाठी मुलाने ५० फूट खोल विहिरीत उडी घेतली, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:43 IST2026-02-17T15:38:52+5:302026-02-17T15:43:39+5:30
पित्याचा मृत्यू; स्थानिकांनी पुत्राला वाचविले: कातवड येथील हृदयद्रावक घटना

Sindhudurg: बुडणाऱ्या पित्याला वाचविण्यासाठी मुलाने ५० फूट खोल विहिरीत उडी घेतली, पण..
मालवण : काही दिवसांपूर्वीच ज्या बागेला 'आगीने' होरपळले होते, त्याच बागेला पुन्हा जीवदान देण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पित्याचा काळाने घास घेतला. पाइपलाइन दुरुस्त करताना पाय घसरुन गेलेला तोल हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. बापाला बुडताना पाहून मुलानेही ५० फूट खोल विहिरीत उडी घेतली. मात्र, तो पित्याला वाचवू शकला नाही. स्थानिकांनी बाहेर काढले नसते तर त्याचाही जीव धोक्यात आला असता. गणेश मारुती आचरेकर (वय ५५) असे मृत पित्याचे नाव आहे.
विहिरीतील शिडीवरून पाइप दुरुस्त करत असताना गणेश यांचा पाय घसरून तोल गेला. विहिरीची खोली सुमारे ४५ ते ५० फूट असून त्यात १२ ते १५ फूट पाणी होते. उंचावरून पडल्याने आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गणेश आचरेकर यांचा बुडून जागीच मृत्यू झाला.
रक्ताच्या नात्याची आर्त हाक!
गणेश यांना पाण्यात बुडताना पाहून विहिरीच्या काठावर असलेला त्यांचा मुलगा चिन्मय (वय २६) यांनी "बाबा... बाबा..." असा टाहो फोडत विहिरीत उडी घेतली; पण स्थानिकांनी त्याला बाहेर काढले नसते, तर आज आचरेकर कुटुंबावर दुहेरी आघात झाला असता.
'आगी'नंतर आलेल्या 'पाण्या'ने घात केला!
आचरेकर यांची आंबा बाग आगीत जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. झाडांना पाणी मिळावे म्हणून जळालेली पाइपलाइन दुरुस्त करायला गेलेल्या गणेश यांना 'पाण्यानेच' मृत्यूच्या कचाट्यात ओढले. आगीतून सावरण्यापूर्वीच पाण्याचा हा घाला कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेला.
स्थानिक तरुणांचे मदतकार्य
साईल परब, अनिष धुरी, बाबल धुरी, नीलेश परब यांच्यासह स्थानिक तरुणांनी तत्काळ विहिरीत उड्या घेतल्यामुळे चिन्मयचे प्राण वाचू शकले. पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.