पराभव दिसताच काहींचा दशावतार सुरू होतो; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:55 IST2025-12-01T13:54:36+5:302025-12-01T13:55:37+5:30
Local Body Election: आमदार नीलेश राणे ही शिवसेनेची भगवी रेष

पराभव दिसताच काहींचा दशावतार सुरू होतो; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
मालवण : आमदार नीलेश राणे ही शिवसेनेची भगवी रेष आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत. नीलेश राणे यांचे प्रामाणिकपणे केलेले काम पाहून काहींना पराभव दिसायला लागला की त्यांचा दशावतार सुरू होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता विरोधकांचा समाचार घेतला.
मालवण येथील नगरपालिका निवडणूक प्रचारसभेत रविवारी सायंकाळी एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह अन्य उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, नारायण राणे यांची सिंधुदुर्गात महायुती व्हावी अशी इच्छा होती. मात्र, ती होऊ शकली नाही. लोकशाहीत सर्वच पक्षांना निवडणूक लढवायचा अधिकार आहे. लोकांचे माझ्यावर प्रेम आहे. सत्ता आणि पैशांपेक्षा माणसे किती कमावली याला महत्त्व आहे. एकनाथ शिंदे कधी घाबरला नाही. डॉक्टर नसला तरीही अनेक छोटी-मोठी ऑपरेशन या एकनाथ शिंदेने केलेली आहेत. नीलेश राणे त्याच शिवसेनेत आहे. त्यामुळे त्यांनी चांगले काम करताना घाबरायचे नाही.
मालवण शहर पर्यटनदृष्ट्या मागे
नीलेश राणे म्हणाले, मागील दहा वर्षांत मालवण शहर पर्यटनदृष्ट्या मागे गेले आहे. आमच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. माझ्यावर टीका होत आहे; पण, येथे उपमुख्यमंत्री शिंदे असल्यामुळे मी कुणाचीही नावे इथे घेणार नाही. ज्यांनी ज्यांनी पक्षावर वार केले त्यांचे वार माझ्यावर झेलले आहेत. मी माझ्या मतदारसंघाचा, जिल्ह्याचा अपमान होऊ देणार नाही. नारायण राणे यांनी मला आशीर्वाद दिला आहे.
नारायण राणे यांच्याशी चर्चा
एकनाथ शिंदे मालवण येथे आले असता ते थेट नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी नीलरत्न बंगल्यावर गेले. तिथे नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. मागील काही दिवसांत सिंधुदुर्गात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.