सिंधुदुर्ग उद्धवसेनेतर्फे १३ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:52 IST2025-08-05T17:51:31+5:302025-08-05T17:52:28+5:30

सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न

Sindhudurg Uddhav Sena to hold massive protest on Mumbai Goa highway on August 13 | सिंधुदुर्ग उद्धवसेनेतर्फे १३ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन

सिंधुदुर्ग उद्धवसेनेतर्फे १३ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन

कुडाळ : संपूर्ण देशात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. पण, मुंबई - गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामागील जबाबदारी नितीन गडकरींचीदेखील आहे. कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले आहेत आणि रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी निकृष्टपणा असल्यामुळे रस्त्याची खराब अवस्था पाहायला मिळते.

मुंबईतील चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणावर गावाला येतात. त्यामुळे यावर्षीही त्यांना त्रास होऊ नये, या दृष्टीने तसेच सरकारला जाग आणण्यासाठी बुधवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता कुडाळ तालुक्यातील मुंबई - गोवा महामार्गावरील हुमरमळा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कुडाळ एमआयडीसी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, युवक जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कृष्णा धुरी, गंगाराम सडवेलकर, बबन बोभाटे, बाबल गावडे, दीपक गावडे आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, मुंबई - गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हा महामार्ग अकरा वर्षांपूर्वी सुरू झाला असला तरी आतापर्यंत त्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत आणि अनेक ठिकाणी अपघात होतात. चौपदरीकरणाचा मानस असूनही हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही. तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील गणेशोत्सवापासून महामार्ग पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते.

पण, आता दुसरा गणेशोत्सव आला तरी काम संपलेले नाही आणि पुढील किती वर्षे हे कामे पूर्ण होणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, युवक सेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्त्वाखाली दि. १३ ऑगस्टला चक्का जाम आंदोलन होणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या पैशांचा अपव्यय

परशुराम उपरकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय नेतृत्व आणि मंत्री बदलले. पण, कोणत्याही काळात या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराला दरवर्षी दहा टक्के वाढीव पैसे दिले जातात. हा निधी जनतेचा आहे. मात्र, ठेकेदार त्याचा लाभाप्रमाणे योग्य वापर करत नाही. त्यामुळे हा रस्ता दुरवस्थेत आहे आणि आमचे आंदोलन याच विरोधात आहे, असे उपरकर यांनी नमूद केले.

खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन : सतीश सावंत

सतीश सावंत म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची पायाभरणी केली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितले होते की, शंभर वर्षे हा रस्ता टिकेल. मात्र, पंधराव्या वर्षी हा रस्ता अत्यंत निकृष्ट अवस्थेत आहे. या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी १३ ऑगस्टला आंदोलन होणार आहे.

Web Title: Sindhudurg Uddhav Sena to hold massive protest on Mumbai Goa highway on August 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.