आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 21:54 IST2025-10-10T21:52:50+5:302025-10-10T21:54:37+5:30
Sawantwadi News: सावंतवाडी कुटीर रुग्णालय सध्या कोल्हापूर खंडपीठा मुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनले आहे. याच धर्तीवर राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या रुग्णालयाला भेट देत येथील रुग्ण सुविधांची पाहणी केली.

आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
सावंतवाडी - सावंतवाडी कुटीर रुग्णालय सध्या कोल्हापूर खंडपीठा मुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनले आहे. याच धर्तीवर राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा या रुग्णालयाला भेट देत येथील रुग्ण सुविधांची पाहणी केली. मात्र त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच रुग्णालयाच्या 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी मात्र या घटनेला दुजोरा दिला आहे.
सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला विविध समस्यांनी सध्या ग्रासले आहे. या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नाहीत तसेच रूग्णालयात सुविधा आहेत, पण तंत्रज्ञ नाहीत अशातच रूग्णालया बाबत येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर याचिका दाखल असून, या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत राज्य शासनाला खडे बोल सुनावले असून तज्ञसमिती नेमण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव वीरेंद्रसिंह हेच सिंधुदुर्ग पालक सचिव असून त्यांनी उपजिल्हा रुग्णालया ला भेट दिली आणि रुग्णालयातील समस्याची माहिती घेतली पण आरोग्य सचिव रूग्णालयात असताना इकडे मात्र रुग्णालयातील दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. या राजीनाम्याचे कारण गुलदस्तात असून, वैद्यकीय सेवेवर सतत येणारा ताण यामुळे त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हे सर्व डॉक्टर बीड तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील असून, राज्य शासनाकडून त्याना खास सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमणुका दिल्या होत्या.
दरम्यान या घटनेबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे यांना विचारले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून आता जरी राजीनामा दिला असला तरी ते अजून एक महिना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.