सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरातील माठेवाडा भागात असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणून सोडून दिल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला होता. या आरोपाची पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी गंभीर दखल घेत यातील दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांचा समावेश आहे.शहरातील माठेवाडा भागात २ डिसेंबरला रात्रीच्या वेळी जुगार बसल्याची बातमी सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. यावरून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी जाऊन छापा टाकला.
या छाप्यात काही जुगार खेळणारे युवक पोलिसांच्या हाती लागले होते. पोलिसांनी यातील काहींना जाग्यावरच सोडून दिले आहे. तर काही आरोपींना पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र या सर्व आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.त्यांना पोलीस ठाण्यात आणून सोडून देण्यात आले होते.
याबाबतची माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांना मिळताच त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या सर्व प्रकरणाची कसून चौकशी केली. मात्र ही चौकशी सुरू असताना या चौकशीत कोणताही अडथळा हे अधिकारी ठरू नयेत यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव व पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांनीही दुजोरा दिला आहे.
अलीकडच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची ही सावंतवाडीतील पहिलीच वेळ असून, गेले दीड वर्षे सावंतवाडी पोलीस ठाण्यातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती. पण आता दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने इतर पोलिसात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.अवैध धंदे बंद करा : परशुराम उपरकरअवैध धंद्यातील आरोपी सोडल्याप्रकरणी दोघाही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मात्र पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत. अनेक ठिकाणी अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत, असा आरोप करत जुगार प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत का? याचीही चौकशी करा, अशी मागणीही उपरकर यांनी केली आहे.