सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:05 PM2018-12-06T14:05:01+5:302018-12-06T14:09:19+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धेत प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

Sindhudurg: Now, one crore prize for clean zilla parishad | सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीस

सिंधुदुर्ग : स्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीस

Next
ठळक मुद्देस्वच्छ जिल्हा परिषदसाठी आता एक कोटीचे बक्षीसअभियानात सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहन : कमलाकर रणदिवे

सिंधुदुर्गनगरी : शासनाने स्वच्छ भारत मिशन आणखी प्रभावित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रभाग ते जिल्हा परिषद अशा विविध स्पर्धा जाहीर केल्या असून, उत्कृष्ट प्रभागाला १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धेत प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्या पंचायत समितीला ५० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाग घेणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.
कमलाकर रणदिवे यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते.

यावेळी रणदिवे पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छतेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने ग्रामपंचायत प्रभाग स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत सर्व स्वायत्त संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग वाढवावा यासाठी स्पर्धांचे आयोजन केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामअंतर्गत आता ग्रामपंचायत प्रभागवार स्वच्छ प्रभाग स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रभागांची तपासणी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत गठीत समितीद्वारे १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे. उत्कृष्ट प्रभागासाठी १० हजार रुपये एवढे पारितोषिक असून प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एक प्रभाग निवडला जाणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातील एक ग्रामपंचायत उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवडली जाणार असून ही स्पर्धा तालुकास्तरावर होणार आहे.

यासाठी प्रत्येक प्रभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतीला प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गठीत केलेल्या समितीद्वारे १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत तपासणी होणार आहे.

उत्कृष्ट जिल्हास्तर ग्रामपंचायत स्पर्धा

जिल्हास्तरावर उत्कृष्ट प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे ग्रामपंचायतींचे क्रमांक काढण्यात येणार असून यासाठी जिल्हा परिषद प्रभागातून निवड झालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी या स्पर्धेसाठी होणार आहे. ही तपासणी १ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून यासाठी ५ लाख, ३ लाख, २ लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

विभागस्तर उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धा

जिल्हास्तरावर बक्षीसपात्र ठरलेल्या गुणानुक्रमे प्रथम दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरावर उत्कृष्ट ग्रामपंचायती म्हणून निवड करण्यात येणार असून यासाठी प्रथम क्रमांकास १० लाख, द्वितीय ८ लाख आणि तृतीय क्रमांकास ६ लाख रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या ग्रामपंचायतींची विभागीय आयुक्तांकरवी १ ते ३१ मार्च या कालावधीत तपासणी केली जाणार आहे.

राज्यस्तर उत्कृष्ट ग्रामपंचायत स्पर्धा

विभागस्तरावर बक्षीसपात्र ठरलेल्या पहिल्या दोन ग्रामपंचायतींना या स्पर्धेत सहभाग घेता येणार असून या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय तपासणी समितीमार्फत १ मे ते ३० जून या कालावधीत तपासणी होणार आहे. यासाठी अनुक्रमे २५, २० आणि १५ लाख रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा व पंचायत समिती स्पर्धा

ही स्पर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी असून ती राज्यस्तरावर होणार आहे. स्वच्छ जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांकास १ कोटी, द्वितीय क्रमांकास ७५ लाख आणि तृतीय क्रमांकास ५० लाख रुपये तर स्वच्छ पंचायत समितीसाठी प्रथम क्रमांकास ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय क्रमांकास २० लाख अशी बक्षीस योजना असल्याचे रणदिवे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg: Now, one crore prize for clean zilla parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.