सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' प्रणालीत राज्य, देशात रोल मॉडेल ठरेल : पालकमंत्री नितेश राणे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 2, 2025 14:03 IST2025-05-02T14:01:17+5:302025-05-02T14:03:12+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'एआय प्रणाली'चा शुभारंभ 

Sindhudurg district will become a role model in the state and country in the AI system says Guardian Minister Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' प्रणालीत राज्य, देशात रोल मॉडेल ठरेल : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' प्रणालीत राज्य, देशात रोल मॉडेल ठरेल : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग: "सिंधुदुर्ग जिल्हा हा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा 'एआय' प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. 

एआय प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनात त्याचा वापर करण्याचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात आणि देशात एआय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री राणे यांनी एआय युक्त जिल्हा करण्यामागील संकल्पना विषद केली.

ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहिर केले. साक्षरतेमध्ये जिल्हा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आलेला आहे. उत्पन्नामध्ये पाच क्रमांकांमध्ये आहे. टँकरमुक्त जिल्हा म्हणून महत्त्वाची ओळख आहे. आता पुढची २५ ते ५० वर्षे हा महाराष्ट्रातला नाही, तर देशातला पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होणार आहे. 

'मार्वल' ही जी संस्था आहे, जेव्हा आम्हाला मंत्री म्हणून आपले मंत्रालय 'एआय'मध्ये आणायचे, अशा सूचना आल्या, माझ्या मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विभागामध्ये 'एआय'चा वापर कसा करू शकतो, याबद्दल 'मार्वल' बरोबर माझ्या बैठका सुरू झाल्या. जिल्हा पातळीवर आपल्याला तंत्रज्ञान आणायचे असेल, तर त्याच्यासमोर प्रचंड आव्हाने होती. 'एआय' युक्त म्हणजे जिल्ह्यामध्ये काय बदल घडणार आहे, हे आपल्याला समजले पाहिजे, म्हणूनच थोड्या संवादात्मक पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सांगितले.

'एआय'मुळे नोकऱ्या जाणार नाहीत वाढणार

आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, डॉक्टर कमी आहेत, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निर्माण झालेली दरी 'एआय'च्या माध्यमातून भरता येऊ शकते. 'एआय' कोणाच्या नोकऱ्या घेणार नाही, आम्हाला माहिती, डेटा पुरवणार, डेटा सगळ्यांचा एकत्र करणार. सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयामध्ये कमी वेळ घालवावा या दृष्टिकोनातून 'एआय'चा वापर होणार आहे. वनखात्याकडे कर्मचारी नाहीत, साधनसामग्री नाही, तरी 'एआय'च्या मदतीने प्राण्यांचा पॅटर्न समजून घेतला जाईल, लोकांना माहिती दिली जाईल. पोलीस खात्यालाही 'एआय'ची मदत होईल, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत होईल. 'एआय'मुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट इंटरनेट आणि सेलफोन आल्यामुळे जशा नोकऱ्या वाढल्या, तशाच 'एआय'मुळेही वाढतील. 

घाईत वडिलांचे घातले जॅकेट

सकाळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात घाईत जॅकेट घातले, तेव्हा माझ्याच माणसाने सांगितले, साहेब, हे मोठ्या साहेबांचे जॅकेट आहे. त्यामुळे आज योग्य जागी, योग्य दिवशी, योग्य माणसाचे ब्लेझर घालून उभा असल्यामुळे मला विश्वास आहे की हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरेल" असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Web Title: Sindhudurg district will become a role model in the state and country in the AI system says Guardian Minister Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.