‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल; अहिल्यानगर द्वितीय, साताऱ्याला तृतीय क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:57 IST2024-12-12T11:56:16+5:302024-12-12T11:57:33+5:30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल; अहिल्यानगर द्वितीय, साताऱ्याला तृतीय क्रमांक
ओरोस : ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर दुसऱ्या, तर सातारा तिसऱ्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९६ हजार ८३४ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी ९०.८६ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यांना पहिल्या टप्प्यात १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमापासून ते कार्यपद्धतीपर्यंत बदल होत आहे. यातीलच ‘अपार’ हा एक उपक्रम कार्यान्वित झाला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच ‘डिजिलॉकर’ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यास ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’, असे म्हणतात. युनिफाइड डिस्ट्रिक्ट ॲण्ड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच ‘यू-डायस’ पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी केली जात आहे. येथे व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवण्यात येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६५५ शाळांमधील ९६ हजार ८३४ विद्यार्थ्यांंपैकी आतापर्यंत ८७ हजार ९८५ विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्याचे ९०.८६ टक्के काम पूर्ण झाले असून, जिल्हा राज्यात अव्वल आहे.
असा तयार होणार ‘अपार’
‘अपार’ ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे. पालकांनीही याबाबत जागरूक असण्याची अपेक्षा आहे. ‘अपार’साठी यू-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक, आईचे नाव, वडिलांचे नाव, आधार कार्डवरील नाव, आधार क्रमांक हा तपशील अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचे ‘यू-डायस’ आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. विद्यार्थी १८ वर्षांखालील असेल, तर या प्रक्रियेसाठी पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. या सगळ्या माहितीची शाळांना खातरजमा करायची आहे.
तांत्रिक अडचणीही..
विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी करताना एकाच वेळी विद्यार्थी आणि पालक यांच्या आधार क्रमांकासह पालकांचे संमतीपत्र भरून घेण्यात येत आहे. यात अडचणी आल्यास ‘अपार’ नोंदणी होत नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असल्यास ‘अपार’ची नोंदणी होत नसल्याचे शिक्षकवर्गाकडून सांगण्यात येत आहे.