Anganewadi Jatra 2026: श्री देवी भराडी मंदिर तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार, वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:54 IST2025-12-04T15:52:38+5:302025-12-04T15:54:16+5:30
देवीला कौल लावून तारीख निश्चिती : लाखो भाविकांचे आहे श्रद्धास्थान

Anganewadi Jatra 2026: श्री देवी भराडी मंदिर तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार, वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारीला
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी निश्चित झाली आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक या यात्रेस उपस्थिती दर्शवतील, असा अंदाज आहे.
आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी ‘याचि देही, याचि डोळा’ पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांसह आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली.
अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.
मंदिर ३ ते ५ डिसेंबर राहणार बंद
जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेची तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्री देवी भराडी मंदिर ३ ते ५ डिसेंबर २०२५ असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.