पोस्टातून तार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सिंधुदुर्गातील वीरपत्नी सरस्वती राजगे यांनी ऐकवली युद्धाची दाहकता

By अनंत खं.जाधव | Updated: May 10, 2025 18:04 IST2025-05-10T18:02:04+5:302025-05-10T18:04:37+5:30

अनंत जाधव सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठरावीक गावे आहेत ज्या गावांना सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने नाव ...

Saraswati Rajge a brave wife from Sindhudurg recounted the heartbreaking story of the 1965 India Pakistan war | पोस्टातून तार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सिंधुदुर्गातील वीरपत्नी सरस्वती राजगे यांनी ऐकवली युद्धाची दाहकता

पोस्टातून तार आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सिंधुदुर्गातील वीरपत्नी सरस्वती राजगे यांनी ऐकवली युद्धाची दाहकता

अनंत जाधव

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठरावीक गावे आहेत ज्या गावांना सैनिकी परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे असे गाव म्हणजे कलंबिस्त. हे गाव निर्सगाच्या सान्निध्यात वसले असून, या गावातील अनेक मुले ही देशप्रेमाने भारावून जात सैन्यात भरती झाली होती. त्यातीलच एक नाव होतं बाबली राजगे यांचे. राजगे यांच्या कुटुंबात सैन्यात पूर्वी कोणी नव्हते. बाबली राजगे हे कुटुंबातील पहिलेच जे सैन्यात भरती झाले होते.

याच काळात म्हणजेच १९६५ मध्ये भारत-पाकिस्तानयुद्ध झाले आणि शत्रूच्या हल्ल्यात हवालदार बाबली राजगे हे शहीद झाले. पाकिस्ताननेभारतीय सैनिकांवर बॉम्बचा वर्षाव केला होता. त्यात बाबली राजगे हे शहीद झाले होते. विशेष म्हणजे शहीद राजगे यांचे पार्थिव घरी न आणता फक्त अंगावरील सैनिकी पोषाख घरी आणण्यात आला होता. यावरून १९६५ च्या युद्धाची भीषणता आजही आठवली तरी राजगे कुटुंबीयांचा कंठ दाटून येतो.

शहीद राजगे यांच्या वीर पत्नी सरस्वती राजगे यांनी तर हा प्रसंग माझ्यासाठी आभाळ कोसळल्यासारखा होता, असे सांगितले. वयाच्या ९१ वर्षीही मला हा प्रसंग चांगला आठवतो. “तिकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे एवढंच माहीत होतं. पण, टीव्ही, मोबाइल नाही, पेपर नाही. त्यामुळे युद्ध थांबलं की सुरू आहे हे सांगायला पण कोणी येत नव्हतं. अशातच एके दिवशी दुपारच्या वेळी पोस्टातून तार आली आणि सर्व काही संपलं.”

त्यांना शेवटचं बघायलाही मिळालं नाही

मग पुढील दोन-चार दिवसांत त्यांचा पोशाख आला. पण, आम्हाला काही त्यांना शेवटचं बघायला मिळालं नाही. माझी मुलं लहान होती. एक पहिलीत होता तर मुलगी शाळेत जात नव्हती. अशा प्रसंगात ते दु:ख पचवत स्वत:ला सावरत उभे राहिलो आणि आज हे दिवस पाहतो आहोत. आमच्या घरात तसे पूर्वी सैन्यात कोणीही नव्हतं आणि आजही नाहीत. पण, त्यांना देशसेवेची आवड होती त्यातून ते पुढे पुढे गेले. आमचे शिक्षणही जेमतेम पण ते मागे हटले नाहीत. तेव्हा भारत-पाकिस्तानचे युद्ध मोठे झाले होते. त्याच अगोदर काही वर्षे ते सैन्यात भरती झाले होते, असे शहीद राजगे यांच्या पत्नी सरस्वती राजगे यांनी सांगितले.

मुलांच्या शिक्षणासाठी झटल्या

आपले पती देशसेवेत शहीद झाले. तरी सरस्वती राजगे यांनी धीर सोडला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत राहिल्या हे विशेष आहे. मी शिकली नाही; पण, माझी दोन्ही मुले शिकली पाहिजेत, अशा त्या नेहमी म्हणत असत.

आठवणी ताज्या

भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या १९६५च्या लढाईनंतर तब्बल ६० वर्षांनी पुन्हा एकदा सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यानिमित्ताने वीर पत्नीने आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

Web Title: Saraswati Rajge a brave wife from Sindhudurg recounted the heartbreaking story of the 1965 India Pakistan war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.