देशाच्या हाकेला प्रतिसाद द्यावा : पाटणे
By Admin | Updated: January 29, 2015 00:11 IST2015-01-28T22:37:17+5:302015-01-29T00:11:42+5:30
दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे कोकण रत्न सागरी मोहिमे’ची सांगता भाट्ये येथे झाली.

देशाच्या हाकेला प्रतिसाद द्यावा : पाटणे
रत्नागिरी : देशाच्या सीमेवर लष्कर लढत असल्यामुळेच आपण आज सुखाने व शांततेने जगत आहोत. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी युवकांकडे आहे. त्यामुळे, देशाच्या हाकेला युवकांनी साद देणे गरजेचे आहे, असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.दोन महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे कोकण रत्न सागरी मोहिमे’ची सांगता भाट्ये येथे झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर नागपूरचे एनसीसी कमांडिंग आॅफिसर कॅ. तुषार वाळुंजकर, कमांडिग आॅफिसर कर्नल पी. वाय. परबते, रोटरी क्लब, रत्नागिरीचे अध्यक्ष विनायक हातखंबकर, धरमसिंह चौहान आदी उपस्थित होते.
कमांडिग आॅफिसर कर्नल पी. वाय. परबते यांनी छात्रसैनिकांना पाण्यातील साहसी व धाडसी वृत्तीला चालना देणे, तसेच त्यांच्यामध्ये विश्वास, शक्ती, मानसिकवृत्ती बळकट करणे व दर्यावर्दी जीवनाचा अनुभव प्राप्त करणे, यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
कॅडेट राखी वाल्मिकी (पुणे) हिने सागरी मोहिमेत सहभागी झाल्याने पुलींग, सेलींगसहित नेव्हीचे जीवन, सागरी प्रवासाबरोबर येथील संस्कृती अनुभवयास मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर कॅडेट शिवानी कदम (कोल्हापूर), शिवानी कदम, पूजा राणे (रत्नागिरी), संकेत रामाणी (रत्नागिरी), वरूण डिक्रज, शुभम पोटे (कोल्हापूर), पुष्कराज माने (सावंतवाडी) यांनी आपले मोहिमेतील अनुभव कथन केले.
एनसीसी कमांडिंग आॅफिसर कॅ. तुषार वाळुंजकर यांनी सरखेल कान्होजींना भावपूर्ण श्रध्दांजली म्हणून, सागरी मोहिम राबविण्यात आली असल्याचे सांगितले.
मोहिमेच्या सुरूवातीच्या दोन दिवसात कॅडेटस्ना प्रचंड त्रास झाला. उंच लाटा, वेगवान वारे याचा सामना करीत कॅडेटनी जुळवून घेतलं. मोहिमेतंर्गत ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्थानिकांचे राहणीमान जाणून घेणे, पथनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले. सर्व कॅडेटस्, कर्मचारी, अधिकारऱ्यांच्या सहकार्यामुळे मोहीम यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)े