सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला, सर्वाधिक पाऊस कोणत्या तालुक्यात.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:42 IST2025-07-22T15:42:31+5:302025-07-22T15:42:54+5:30
मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

संग्रहित छाया
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यात किनारपट्टी भागात मुसळधार, तर अन्य काही भागांत पावसाची संततधार कायम होती. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, त्यानुसार पावसाचा जोर वाढत आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने मच्छीमार बांधवांना समुद्रात आणि नदीकाठच्या नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ४२.१२ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार पासून पावसाचा जोर वाढला असून, तो कायम आहे. सकाळपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यानुसार जिल्ह्यात काही भागांत मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. किनारपट्टी भागात मुसळधार, तर काही भागांत पावसाची संततधार दिवसभर कायम सुरू होती. पावसाचा जोर वाढत असल्याने समुद्राला उधाण, तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे, तर नदीकाठच्या नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात
जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ४२.१२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात देवगड १० मिलिमीटर, मालवण ३० मिलिमीटर, सावंतवाडी ५५ मिलिमीटर, वेंगुर्ला २२ मिलिमीटर, कणकवली ७८ मिलिमीटर, कुडाळ ४४ मिलिमीटर, वैभववाडी ४६ मिलिमीटर, तर दोडामार्ग तालुक्यात ५२ मिलिमीटर पाऊस पडला आहे.