राजू शेट्टींच्या वक्तव्याने कोकणात पडली ठिणगी, कृषी केंद्र चालकांमध्ये दहशत; जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:46 IST2026-03-17T17:43:54+5:302026-03-17T17:46:33+5:30
९० कोटींचे व्यवहार धोक्यात?

राजू शेट्टींच्या वक्तव्याने कोकणात पडली ठिणगी, कृषी केंद्र चालकांमध्ये दहशत; जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
ओरोस : आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या कथित चिथावणीखोर वक्तव्यामुळे जिल्ह्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सिंधुदुर्ग ॲग्रो मार्केटियर्स असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र निषेध नोंदवला आहे.
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून बागायतदार आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
९० कोटींचे व्यवहार धोक्यात?
जिल्ह्यातील बागायतदार आणि कृषी सेवा केंद्र चालक यांच्यात अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बागायतदारांना लागणारी खते व कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर उधारीवर दिली जातात. दरवर्षी सुमारे ९० कोटी रुपयांपर्यंतचा उधारी व्यवहार विश्वासाने होतो. मात्र, शेट्टींच्या वक्तव्यामुळे या विश्वासाला तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेट्टींचे 'ते' विधान काय?
१२ मार्च रोजी झालेल्या मोर्चात राजू शेट्टी यांनी, "विक्रेत्यांचे उधारीचे पैसे देऊ नका, मागणी केल्यास दुकानातील माल बाहेर काढा, काही कारवाई झाली तर मी बघून घेईन," असे वक्तव्य केल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. यानंतर काही कार्यकर्त्यांकडून विक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
प्रशासनाने खबरदारी घ्यावी
अशा वक्तव्यांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि बागायतदारांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.