सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर विविध सेवांसाठी आंदोलन; 'बाहेर चकाचक आतून फकाफक’ बॅनरने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:46 IST2025-08-02T18:46:04+5:302025-08-02T18:46:29+5:30
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय, संघर्ष समितीचा पुढाकार

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर विविध सेवांसाठी आंदोलन; 'बाहेर चकाचक आतून फकाफक’ बॅनरने वेधले लक्ष
ओरोस : रेल्वे प्रशासनाचा जलद गाड्यांना थांबवण्यास नकार, ‘कोकण रेल्वे कोणाची? कोकणी माणसाची की परराज्याची?’ आणि ‘कोकणचा विकास होत आहे, तरी रेल्वे स्टेशन भकास आहे’ अशा घोषणाही देत सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबाव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवारी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्ग या संघटनेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्ने, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरे अशा दहा रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकासह विविध स्थानकांवर कायमस्वरूपी थांबा मिळावा, यासाठी मागील तीन वर्षांपासून संघटनेमार्फत मागणी केली जात आहे. यासाठी विविध लोकप्रतिनिधींशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून उपोषण करूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरीही अद्याप या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.
गणेशोत्सव काळात तत्काळ नवीन गाड्या सुरू करा
२७ ऑगस्ट २०२५ पासून कोकणातील सर्वात मोठा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या सणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही गाडी बुकिंगसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजे २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान, मडुरे ते दादर आणि सावंतवाडी ते दादर असंख्य प्रवाशांसाठी दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या गाड्या कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकासह वैभववाडी व नांदगाव रेल्वे स्थानकांवर तात्काळ आरक्षण खिडकी सुविधा सुरू करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन सुरू करावी
जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर किमान पंधरा लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे करावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील कॅन्टीन तात्काळ सुरू कराव्यात, तसेच प्लॅटफॉर्म सुविधा नसलेल्या सर्व स्थानकांवर प्लॅटफॉर्म सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या या निवेदनामध्ये समाविष्ट आहेत.
रेल्वे स्थानकाबाहेर जनआंदोलन
ही मागणी मान्यता मिळवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाबाहेर जनआंदोलन करण्यात आले. याला प्रवासी संघटना, रिक्षा चालक-मालक संघटना, राजकीय संघटना आणि पत्रकारांनी खुला पाठिंबा दर्शविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, उपाध्यक्ष परशुराम परब, नागेश ओरोसकर, शुभम परब आणि अनेक नागरिक उपस्थित होते.
बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष
जिल्ह्यातील काही रेल्वे स्थानकांचे बाहेरून सुशोभीकरण करण्यात आले असले तरी अंतर्गत सुविधा अजूनही अपुरी आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान ‘काय ती झाडी काय तो प्लॅटफॉर्म, बाहेर चकाचक आतून फकाफक’ असा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.