कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत कोसळली; ठेकेदारांच्या निष्काळणीपणानं लोकांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 16:42 IST2020-07-13T16:35:42+5:302020-07-13T16:42:33+5:30
अनेकदा बैठका व नेत्याचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतलेली नाही.

कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत कोसळली; ठेकेदारांच्या निष्काळणीपणानं लोकांचा जीव टांगणीला
कणकवलीः गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूरही आला आहे. ऐन पावसाळ्यात कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत आज दुपारी कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तसेच वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाऊस सुरू झाल्यापासून कणकवली एस. एम. हायस्कूलसमोरील उड्डाणपूल धोकादायक बनल्याची माहिती प्रशासनाला होती. अनेकदा बैठका व नेत्याचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतलेली नाही.
परिणामी सोमवारी दुपारी संरक्षण भिंत कोसळल्याने सर्व्हिस रस्त्यावर माती आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भविष्यात आणखी संरक्षण भिंत कोसळून दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.