Sindhudurg: तिलारीच्या पर्यटन विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:06 IST2025-07-01T18:05:28+5:302025-07-01T18:06:58+5:30

मांगेलीसाठी हवा विशेष आराखडा

Political will needed for tourism development in Tilari | Sindhudurg: तिलारीच्या पर्यटन विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली फणसवाडी धबधबा

वैभव साळकर

दोडामार्ग : एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले गोवा राज्य, तर दुसऱ्या बाजूला मोठी राष्ट्रीय बाजारपेठ असलेले बेळगाव शहर. वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा देखील विपुल, मात्र तरीसुद्धा राजकीय पुढाऱ्यांची अनास्था आणि स्वतंत्र नेतृत्वाचा अभाव या प्रमुख कारणांमुळे दोडामार्ग तालुका पर्यटनाच्या बाबतीत मागासलेला आहे. तिलारीत साकारलेले आंतरराज्यीय मातीचे धरण, तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली धबधबा, धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत असलेले नागनाथ मंदिर, तळकट येथील वनबाग आदी पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच कृषी पर्यटनाच्या संधी उपलब्ध झाल्यास तालुक्याचा पर्यटन विकास शक्य आहे. त्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

दोडामार्ग तालुक्यात एकापेक्षा एक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. किंबहुना येथील राजकीय पुढारी आणि लोकांनीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. परिणामी या पर्यटनस्थळांची पुरती वाताहत झाली आहे. केवळ पावसाळ्यात धबधब्याखाली न्हाऊन निघण्यापुरतेच पर्यटन तालुक्यात शिल्लक राहिले असून, या मरणासन्न अवस्थेत असलेल्या पर्यटन स्थळांना उर्जितावस्था देण्याची गरज आहे. महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेला तालुका म्हणजे दोडामार्ग ! २७ जून १९९९ ला या तालुक्याची निर्मिती झाली. त्यानंतर आज साधारणतः २५ वर्षांचा काळ लोटला. मात्र, इथली पर्यटनस्थळे अद्याप विकसित झालेली नाहीत. मध्यंतरीच्या काळात पर्यटन विकासाचे स्वप्न दाखविण्यात आले, मात्र कालांतराने ते धुळीलाच मिळाले. त्याचे कारण असे की, इथले राजकीय पुढारी आणि त्यांचे नेते त्यासाठी आग्रही नाहीत.

तालुक्यात महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सर्वात मोठे तिलारी धरण साकारले आहे. या धरणाच्या पायथ्याशी बगीचा आहे. शिवाय धरणाला लागूनच काही अंतरावर उन्नेयी बंधारा आहे. एकेकाळी राणीची बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळकट येथील वनबागेचीही दुरवस्था झाली आहे. धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेरवण-मेढे येथील नागनाथ मंदिराच्या पर्यटन विकासासाठीही प्रयत्न झालेले नाहीत.

भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मांगेलीला, तर दरवर्षी वर्षा पर्यटनासाठी पावसाळ्यात लाखो पर्यटक येतात खरे, मात्र भौतिक सुविधांअभावी त्यांचा हिरमोड होतो. वास्तविक तालुक्याचा पर्यटन विकास सहज शक्य आहे. गोव्यात दरवर्षी येणाऱ्या लाखो देशी-विदेशी पर्यटकांना जवळच असलेल्या दोडामार्ग तालुक्यात वळविले जाऊ शकते. गोव्यासारखे जरी रुपेरी वाळूचे किनारे इथे नसले, तरी इथले सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. मात्र, त्यासाठी पर्यटनाचा विकास आणि पर्यटकांना लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे

हे व्हायला हवे 

दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरण साकारले आहे. या धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे . येथे जलपर्यटन शक्य आहे. डबल डेकर बोट अथवा अन्य साधनांद्वारे ते शक्य आहे. त्याकरिता आराखडा तयार करण्याची गरज आहे. शिवाय तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गार्डनचा म्हैसूर - उटी येथील रॉक गार्डनच्या धर्तीवर विकास शक्य आहे. शिवाय उन्नेयी बंधाऱ्याच्या विकास होणे गरजेचे आहे.

मांगेलीसाठी हवा विशेष आराखडा

मांगेलीमध्ये केवळ वर्षा पर्यटनच नव्हे, तर उन्हाळी पर्यटनालाही वाव आहे. मात्र, त्यासाठी नियोजनबद्ध विकासाची गरज आहे. पॅराग्लायडिंगही इथे सहज शक्य आहे. पण, त्याकरिता ग्रामस्थांची मानसिकता आणि राजकीय पुढाऱ्यांची इच्छाशक्ती गरजेची आहे.

Web Title: Political will needed for tourism development in Tilari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.