पेट्रोल, डिझेल दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी : वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:55 IST2020-06-26T18:53:56+5:302020-06-26T18:55:51+5:30
सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी : वैभव नाईक
मालवण : कोरोना विषाणूचे संकट देशावर अद्यापही कायम असताना आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना पेट्रोल, डिझेलची केलेली दरवाढ ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखीच आहे.
केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल दरवाढीचा प्रमुख मुद्दा प्रचारात आघाडीवर ठेवला होता. मात्र भाजप पक्षाची सलग दोन वेळा देशात सत्ता येऊनही नागरिकांना ह्यअच्छे दिनह्ण पहावयास मिळालेले नाहीत. कोरोना संकट काळातही सलग पंधरा ते वीस दिवस सातत्याने पेट्रोल, डिझेल दरवाढ केल्याने भाजप सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न आमदार वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
गेले १५ ते २० दिवस सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होत आहे. ३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७७.४१ रुपये व डिझेलचा दर ६६.३० रुपये होता. हा दर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा होता. कोरोनाचे संकट विचारात घेत लोकांसाठी पेट्रोल, डिझेलचे दर कमी करायला हवे होते. मात्र केंद्र सरकारकडून दरात कपात होण्याऐवजी वाढ होत गेली. २४ जूनपर्यंत पेट्रोलचा दर ८७.५७ रुपये तर डिझेलचा दर ७८.०५ रुपये प्रति लीटर एवढा वाढविण्यात आला आहे.
नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढाच दर निश्चित करावा
कोरोना संकटातून सावरत असलेल्या देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्यावरील आर्थिक संकट दूर करायला हवे. तरी जिल्हा शिवसेनेच्यावतीने पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून देशातील नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढाच पेट्रोल, डिझेलचा दर निश्चित करावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.