पटोलेंचे निमंत्रण म्हणजे 'होळी है बुरा ना मानो'; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:41 IST2025-03-16T10:40:38+5:302025-03-16T10:41:09+5:30
माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना दिलेले निमंत्रण म्हणजे होळी है बुरा ना मानो सारखे असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल करण्यात येणार असे संकेत त्यांनी दिले.

पटोलेंचे निमंत्रण म्हणजे 'होळी है बुरा ना मानो'; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खुलासा
सावंतवाडी : समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच नितेश राणेंना मंत्रीपद दिले गेले आहे. पण शांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक हे सर्व खपवून कसे घेतात हेच कळत नाही.पण खोटे बोलावे पण रेटून बोलावे अशी त्यांची परिस्थिती झाली असून सर्वसामान्य जनता हे सर्व उलटून टाकतील यांची मला खात्री आहे, असा विश्वास काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केला. तसेच, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना दिलेले निमंत्रण म्हणजे होळी है बुरा ना मानो सारखे असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदल करण्यात येणार असे संकेत त्यांनी दिले.
प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सपकाळ यांनी आपल्या महाराष्ट्राच्या दौर्याची सुरूवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केली आहे. शनिवारी सकाळी ते सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले त्यानंतर येथील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थांनी भेट दिली. तेथे त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अजिंक्य देसाई, गणेश पाटील, रामचंद्र उर्फ आबा दळवी, विलास गावडे, दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, प्रकाश जैतापकर, अमिदि मेस्त्री, महेश अंधारी, राजू मसुरकर, किरण टेम्बुलकर, नागेश मोर्ये, राघवेंद्र नार्वेकर, रवींद्र म्हापसेकर, साक्षी वंजारी, अरूण भिसे उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, या ठिकाणी कॉंग्रेसला काहीशे अडचणीचे दिवस आले आहेत. हे नाकारता येणार नाही. मात्र ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. कॉंग्रेसच्या विचारधारेला मानणारी जनता या ठिकाणी आहे. त्यामुळे येणार्या काळात पक्ष संघटना पुन्हा वाढलेली दिसेल.काहि कठोर निर्णय घेणे सर्वाना गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले.सपकाळ यांनी यावेळी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच राणे काम करीत आहे. त्याचसाठी त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नाही. कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच येणार्या काळात त्यांना त्याची जागा दाखवून देतील सिंधुदुर्गात कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्यायचे आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. येणार्या काळात संघटन बांधण्यात येणार आहे. निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत आणि त्यानंतन निश्चितच या ठिकाणी पक्षाची ताकद वाढलेली दिसेल, असे ही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कॉंग्रेस सोबत येण्याबाबत केलेल्या आवाहनाबाबत विचारले असता ते म्हणाले, गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपाची रणनिती आहे. याचा प्रत्यय या दोघांना येत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखविली. त्यात गैर काय? असे सांगुन काल होळी होती. त्यामुळे बुरा न मानो होली है असे सागुन सपकाळ यांनी अप्रत्यक्ष व्यैक्तीक मत असल्याचे सांगितले.