अन्यथा शालेय क्रीडा स्पर्धा बंद करा

By Admin | Updated: January 10, 2015 00:11 IST2015-01-09T22:00:53+5:302015-01-10T00:11:56+5:30

बांधकाम समिती सभा : जखमी स्पर्धकांवर उपचाराची मागणी

Otherwise, close the school sports competition | अन्यथा शालेय क्रीडा स्पर्धा बंद करा

अन्यथा शालेय क्रीडा स्पर्धा बंद करा

सिंधुदुर्गनगरी : शालेयस्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेत काही स्पर्धक जखमी होतात. मात्र त्या जखमी स्पर्धकांवर उपचार केले जात नाहीत. त्यामुळे असे स्पर्धक जखमी झाले तर येणारा ओषध व दवाखान्याचा खर्च जिल्हा परिषदेने द्यावा अन्यथा या स्पर्धाच बंद कराव्यात अशी मागणी सदस्यांनी बांधकाम समिती सभेत केली.
जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य एकनाथ नाडकर्णी, दिप्ती पडते, रुक्मीणी कांदळगावकर, सदा ओगले, भगवान फाटक, पंढरीनाथ राऊळ, आत्माराम पालयेकर, समिती सचिव तथा बांधकाम अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
सदस्यांना अधिकारच नसतील तर केवळ सभेला तरी का यावे? असा सवाल पंढरी राऊळ यांनी केला. त्यामुळे यापुढे समितीमध्ये कामांना मंजूरी घ्यावी व त्या-त्या कामांचा आढावा घ्यावा अशीही मागणी या सभेत सदस्यांनी केली.
प्राथमिक शाळांतून जिल्हास्तरावर येणाऱ्या विद्यार्थी, खेळाडूंना दुखापत झाल्यास येणारा औषध व दवाखान्याचा खर्च जिल्हा परिषदेने घ्यावा अन्यथा या स्पर्धाच बंद कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
इतिवृत्त उशिरा दिल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी कार्यकारी अभियंता यांनी सभागृहाची माफी मागितली. यावरही नाराजी व्यक्त करत ही बाब दुर्दैवी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच चौकुळ रस्त्याबाबत चुकीची माहिती लिहीली गेली तसेच प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला १ कोटी ६0 लाखाची कामे द्यावीत असे झालेले टिपण ही बाब गंभीर असून यापुढे परिपूर्ण इतिवृत्तलेखनासाठी दोन कर्मचारी बसविण्याची मागणी
केली. (प्रतिनिधी)

दोषींवर कारवाई करावी : सदा ओगले
देवगड गटविकास अधिकारी दौऱ्याला किंवा अन्य ठिकाणी जाताना केबिनला कुलूप लावून जातात. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत सह्या थांबतात. तसेच १0-१0 लाखांच्या मोठ्या कामांनाच मंजुरी दिली जाते. २५-२५ योजनेंतर्गत अनेक कामांचे प्रस्ताव मंजुरच केलेले नाहीत, अशा प्रकारे सुरु असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई प्रस्तावीत करावी अशी मागणी सदा ओगले यांनी बांधकाम सभेत केली.

Web Title: Otherwise, close the school sports competition