..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:51 IST2025-05-08T15:50:14+5:302025-05-08T15:51:28+5:30
जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत

..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला
कणकवली : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार, अशी धमकी देणाऱ्या नारायण राणे यांनी आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा. तसेच बंद चिपी विमानतळ सुरू करावे. त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा कराव्यात, असा टोला उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नारायण राणे हे गेली साडेतीन वर्षे केंद्रीय मंत्री होते. आता लोकसभेचे खासदार आहेत. त्यांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करता आले नाही. आम्ही सुरू केलेले चिपी विमानतळ त्यांच्या कार्यकाळात बंद पडले. ते त्यांना सुरू करता आलेले नाही. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार अशा धमक्या ते देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नेहमीच विकासाला योगदान दिले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग पूर्ण झाला. मात्र, इतर जिल्ह्यात हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.
केंद्रीय मंत्री असताना नारायण राणेंनी हा महामार्ग का पूर्ण करून घेतला नाही. चिपी विमानतळ सुरू करण्याच्या केवळ राणे घोषणा करीत आहेत. आता शक्तिपीठ महामार्गाच्या कामात ठेकेदाराकडून आर्थिक देवाण घेवाणीसाठी राणेंना शक्तिपीठ महामार्ग हवा असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबा असेल.
जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत
शेतकऱ्यांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत. त्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भीक घालणार नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. मात्र, राणेंना मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करता आला नाही. चिपी विमानतळ सुरू करता आले नाही. लोकसभा निवडणुकीत आश्वासन दिलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पाचे काय झाले? त्यामुळे विकासावर बोलण्याचा राणेंना कुठलाही अधिकार नाही, असेही वैभव नाईक यांनी म्हटले आहे.