एनडीएच्या धर्तीवर कोकणातील पहिले सैनिक स्कूल सावंतवाडीत, भोसले सैनिक स्कूल म्हणून मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 20:00 IST2025-11-09T19:59:29+5:302025-11-09T20:00:40+5:30
कोकणातील पहिले सैनिक स्कूल चराठे येथे उभारले जाणार असून त्याच्या इमारतीचे भूमिपूजन लवकरच चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात होणार आहे.

एनडीएच्या धर्तीवर कोकणातील पहिले सैनिक स्कूल सावंतवाडीत, भोसले सैनिक स्कूल म्हणून मान्यता
सावंतवाडी : संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी यांच्या माध्यमातून एनडीएच्या धर्तीवर कोकणातील पहिले सैनिक स्कूल सावंतवाडीत होणार असून, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित 'भोसले सैनिक स्कूल' म्हणून मान्यता मिळाली आहे. कोकणातील पहिले सैनिक स्कूल चराठे येथे उभारले जाणार असून त्याच्या इमारतीचे भूमिपूजन लवकरच चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना भोसले म्हणाले, 'सध्या देशभरात ३३ सैनिक स्कूल्स कार्यरत असून या सर्व शाळांची एकत्रित प्रवेश क्षमता सुमारे ३,११७ विद्यार्थ्यांची आहे. देशात सैनिकी शिक्षणाच्या वाढत्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने अलीकडेच ६९ नवीन सैनिक स्कूल्सना मान्यता दिली आहे.'
'या नवीन शाळा या मॉडेलवर कार्यरत राहणार असून त्याद्वारे देशभरात आणखी ९,६१७ प्रवेश क्षमतेच्या जागा निर्माण होतील अशा प्रकारे पारंपरिक आणि नव्याने मान्यता प्राप्त शाळांसह देशातील सैनिक स्कूल्सची एकूण प्रवेश क्षमता साधारण १२,००० विद्यार्थ्यांपर्यंतची संख्या पोहोचणार आहे', अशी माहिती भोसले यांनी दिली.
ते म्हणाले की, 'दरवर्षी संपूर्ण देशभरातून जवळपास दीड लाख विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षेतून येणार आहेत. परंतु, उपलब्ध जागा अत्यल्प असल्याने या संस्थांमध्ये प्रवेश मिळविणे अत्यंत स्पर्धात्मक व प्रतिष्ठेचे मानले जाते. सैनिक स्कूल्स या केवळ शैक्षणिक संस्था नसून, लष्करी अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविणाऱ्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत.'
'भोसले सैनिक स्कूल हे कोकण विभागातील भारत सरकार मान्यता प्राप्त पहिले सैनिक स्कूल ठरले आहे. हे विद्यालय चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात उभारले जात आहे. येथे आधुनिक शिक्षणाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम साधला जाणार आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण स्थानिक स्तरावर मिळावे, हा या शाळेचा मुख्य हेतू आहे', असे त्यांनी सांगितले.
'हे कोकणातील पहिले सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल ठरणार आहे. विद्यार्थिनींसाठी असलेला हा आरक्षित कोटा महिला सबलीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असून मुलींनाही समान दर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि नेतृत्त्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे', अशी माहिती भोसले यांनी यावेळी दिली.
'भोसले सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धाडस, आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव यांचा विकास होईल. हे विद्यालय विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम न करता त्यांच्यातील नेतृत्वक्षमतेला घडविण्याचे कार्य करेल', असेही भोंसले म्हणाले.