Sindhudurg: सासोलीत ओंकार हत्तीचे आगमन; शेतकरी चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:20 IST2026-03-21T14:19:51+5:302026-03-21T14:20:14+5:30
वनविभागाची टीम हत्तीच्या मागावर असून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Sindhudurg: सासोलीत ओंकार हत्तीचे आगमन; शेतकरी चिंतित
दोडामार्ग : सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा सासोली गावात पोहोचला आहे. पुन्हा तो गोव्याच्या दिशेने जाणार की बांदा परिसरात जाणार हे महत्वाचे आहे.
ऐन काजू हंगामात पुन्हा एकदा सासोली परिसरात ओंकार दाखल झाला असून, काजू गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास सासोली येथील जंगलात शेतकरी काजू गोळा करत असताना हा हत्ती त्यांच्या नजरेस पडला. ऐन हंगामातच हत्ती दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत यांनी दिली.
दरम्यान, वनविभागाची टीम हत्तीच्या मागावर असून त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी विशेषतः काजू गोळा करताना जंगल भागात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. हत्तीच्या उपस्थितीमुळे काजू हंगामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.