Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडी यात्रेवर ‘नो नेटवर्क’चे सावट; बीएसएनएलचा कारभार रामभरोसे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:18 IST2026-02-05T19:18:08+5:302026-02-05T19:18:53+5:30
मोबाइलला रेंज मिळेना, कॉल लागेना; स्वतंत्र टॉवर असूनही बागायत-माळगाववासीय बेजार

संग्रहित छाया
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव ९ व १० फेब्रुवारी रोजी होत आहे. या उत्सवासाठी अवघा महाराष्ट्र सिंधुदुर्गात एकवटतो. मात्र, या सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असतानाच, आंगणेवाडी परिसरातील विस्कळीत दूरसंचार सेवेने ग्रामस्थांची डोकेदुखी वाढवली आहे. बागायत आणि माळगाव परिसरात ‘बीएसएनएल’चे स्वतंत्र टॉवर असूनही रेंज मिळत नसल्याने ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी अवस्था झाली आहे.
व्हॉट्सॲप कॉलचाच आधार गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोबाइलला रेंज मिळणे दुरापास्त झाले आहे. साध्या कॉलसाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते, तर लागलेले कॉल वारंवार कट होत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, नागरिकांना आपले महत्त्वाचे संवाद तोडक्या-मोडक्या शब्दांत व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून करावे लागत आहेत. इंटरनेटचा वेगही मंदावल्याने दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत.
लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आंगणेवाडी यात्रेत दरवर्षी ७ ते ८ लाख भाविक दर्शनासाठी येतात. एवढ्या मोठ्या गर्दीत कुटुंबातील व्यक्ती ताटातूट झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी संपर्क साधायचा झाल्यास मोबाइल सेवा हाच एकमेव पर्याय असतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता यात्रेत संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडी किंवा अन्य समस्या उद्भवल्यास प्रशासनाला समन्वय साधणे कठीण जाईल.
टॉवर शोभेचे बाहुले?
बागायत आणि माळगाव या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी बीएसएनएलचे स्वतंत्र टॉवर्स उभे आहेत. मात्र, या टॉवर्स मधून योग्य सिग्नल मिळत नसल्याने हे टॉवर केवळ शोभेच्या वास्तू उरल्या आहेत का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. यात्रोत्सवापूर्वी तांत्रिक बिघाड दुरुस्त का केला जात नाही, हा मोठा प्रश्न आहे.
प्रशासकीय अनास्था
दरवर्षी आंगणेवाडी यात्रेसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज असते. मात्र, दूरसंचार विभागाने (BSNL) आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र दिसत आहे. यात्रेच्या नियोजनात संपर्काचा अभाव राहिल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रवाशांची होणार दैना
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना गुगल मॅप्स किंवा ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासते. रेंज नसल्यास प्रवाशांना रस्ते शोधणे कठीण जाईल आणि डिजिटल पेमेंटच्या युगात रोख रक्कम अभावी व्यापाऱ्यांचे ही नुकसान होण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांचा इशारा
येत्या दोन दिवसांत जर दूरसंचार सेवेत सुधारणा झाली नाही, तर बीएसएनएल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यात्रोत्सवापूर्वी ‘मोबाइल रेंज’ सुरळीत न झाल्यास भाविकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.
‘आंगणेवाडी यात्रा म्हणजे आमच्यासाठी वर्षातील सर्वात मोठा व्यापाराचा आणि श्रद्धेचा सण असतो. राज्यभरातून लाखो भाविक येतात, पण बीएसएनएलच्या भंगार सेवेमुळे यंदा आमचं कंबरडं मोडण्याची चिन्हं आहेत. आजच्या काळात ग्राहक ऑनलाइन पेमेंट (UPI) वर अवलंबून असतो, पण इथे साधा फोन लागत नाही, तर नेट कुठून चालणार? बागायतमध्ये टॉवर असूनही जर रेंज नसेल, तर त्या टॉवरचा उपयोग काय? प्रशासनाने आणि बीएसएनएलने ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर यात्रेत होणाऱ्या गोंधळाला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील. आमचा संयम आता सुटत चालला आहे.’ - अविनाश ऊर्फ पपी नरे (व्यापारी, बागायत)