मोबाइल चोरला अन् चोरटा जाळ्यात अडकला; कणकवलीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पणजीत घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:38 IST2025-06-10T12:37:50+5:302025-06-10T12:38:21+5:30

एलसीबी व कणकवली पोलिस पथकाने अवघ्या १६ तासात चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Mobile phone stolen and thief caught in the trap; Thief who stole in Kankavali taken into custody in Panaji | मोबाइल चोरला अन् चोरटा जाळ्यात अडकला; कणकवलीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पणजीत घेतले ताब्यात

मोबाइल चोरला अन् चोरटा जाळ्यात अडकला; कणकवलीत चोरी करणाऱ्या चोरट्यास पणजीत घेतले ताब्यात

कणकवली: शहरातील कनकनगर येथील समृद्धी मिलिंद कोरगावकर यांच्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसानी  लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड केले आहे. चोरट्याने चोरलेल्या मोबाईलचे पणजी येथे मिळालेले लोकेशन आणि सीसीटीव्हीचा आधार घेत  संतोष वसंत सुतार (४८, रा. संगमेश्वर ,जि.रत्नागिरी) याला  ताब्यात घेतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व अन्य चांदीचा ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला आहे. 

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि कणकवली पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले , उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल हाडळ, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, समीर भोसले, पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे, डॉमनिक डिसोझा,  जॅक्सन घोंसालवीस,आशिष जामदार आदींच्या पथकाने केली. 

कनकनगर येथील रहिवासी परिचारिका समृद्धी मिलिंद कोरगावकर या शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात  ७ जून रोजी रात्रपाळीसाठी कामावर गेल्या होत्या. तर त्यांचे पती मिलिंद हे आपल्या वडील आणि मुलासोबत मालवण येथील बहिणीकडे गेले होते. ८ जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजता ड्युटीवरून परत आल्यानंतर समृद्धी कोरगावकर याना आपल्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरी झालेली दिसली. सोन्याचे व चांदीचे दागिने असा सात लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समृद्धी कोरगावकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सीसीटीव्ही फुटेजचा फायदा !

समृद्धी कोरगावकर यांच्या घरात चोरी झाल्यानंतर या चोरीतील आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता. पोलिसांनी या सीसीटीव्हीचा आधार घेत चोरट्याचा शोध सुरू केला. 

मोबाईल लोकेशनमुळे चोरटा सापडला! 

चोरट्याने समृद्धी कोरगावकर यांच्या घरातील एक मोबाईलही चोरून नेला होता. पोलिसांच्या तपासात या मोबाईलचे लोकेशन पणजी येथे असल्याचे समजले.त्यानुसार पोलिसांनी पणजी येथे जात चोरट्याचा शोध घेतला.त्यामुळे त्याला ताब्यात घेणे सोपे गेले.

पणजी येथे लागला छडा! 

चोरीचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि कणकवलीतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्याच्या मागावर होते.  पणजी शहरात पायी गस्त घालत असताना संतोष वसंत सुतार हा पणजी येथील एका कॅसीनोच्या बाहेर त्यांना दिसून आला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्याचा चेहरा पोलिसांसमोर असल्याने त्याला ओळखणे  सोपे झाले.त्याला ताब्यात घेतल्यावर  त्याच्याकडे चोरीतील दागिने व मुद्देमाल सापडून आला.

अवघ्या १६ तासांत चोरीचा उलगडा !

कणकवली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे चोरीच्या घटनांमुळे पोलिसांना टार्गेट केले जात होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने अवघ्या १६ तासांत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. त्या चोरट्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कणकवली शहरात तसेच अन्य तालुक्यात झालेल्या आणखी काही  चोऱ्यांचा उलगडाही लवकरच होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यादृष्टीने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

Web Title: Mobile phone stolen and thief caught in the trap; Thief who stole in Kankavali taken into custody in Panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.