मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:33 IST2022-07-06T18:01:01+5:302022-07-06T18:33:33+5:30

अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा

MNS youth leader Amit Thackeray meets Rane at his residence | मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट

मनसे युवा नेते अमित ठाकरेंची राणेंच्या निवासस्थानी भेट

कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान राबवत असून ते सद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काल, त्यांनी सावंतवाडीत मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी साधला होता. आज, बुधवारी ते कणकवलीत दाखल झाले आहेत.

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट दिली. भाजपचे आमदार युवा नेते नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, किर्तिकुमार शिंदे, प्रशांत कनोजिया आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपमध्ये सूत जुळल्याचे दिसून येत आहे. याआधीही मनसे-भाजप युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आगामी निवडणुकीतच याबाबतचे चित्र स्पष्ट होवू शकेल. यातच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरेंही सक्रीय झाले आहेत. सद्या कोकण दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरेंनी आज राणेंच्या निवासस्थानी भेट घेतल्याने कोकणातही नव्या राजकारणाची नांदी पाहायला मिळणार की काय हेच पाहावे लागणार आहे.

Web Title: MNS youth leader Amit Thackeray meets Rane at his residence