मत्स्योत्पादन वाढीसाठी मंत्री राणे यांनी सुचविला कालबद्ध कृती आराखडा, यंदाच्या हंगामात किती झाली वाढ.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:31 IST2025-08-12T16:29:13+5:302025-08-12T16:31:32+5:30

तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे आवाहन

Minister Rane suggests time bound action plan to increase fish production | मत्स्योत्पादन वाढीसाठी मंत्री राणे यांनी सुचविला कालबद्ध कृती आराखडा, यंदाच्या हंगामात किती झाली वाढ.. वाचा

मत्स्योत्पादन वाढीसाठी मंत्री राणे यांनी सुचविला कालबद्ध कृती आराखडा, यंदाच्या हंगामात किती झाली वाढ.. वाचा

कणकवली : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये यामध्ये आणखी वाढ अपेक्षित असून त्यासाठी विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत. तसेच राज्यातील तलावामधील गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी मत्स्यव्यवसाय हंगामाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे यांनी या सूचना दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक उपस्थित होते. तर, राज्यातील प्रादेशिक उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री राणे म्हणाले, ड्रोन सर्वेक्षण सुरू केल्या नंतर सागरी मत्स्योत्पादनात चांगली वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे तलावातील गाळ काढल्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन वाढणार आहे. हा गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वयाने कार्यक्रम आखावा. तलावांवर असलेली अतिक्रमणे काढण्यात यावी. कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही याची अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. जितकी चांगली शिस्त राहील तितके चांगले उत्पादन वाढेल. त्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांनी मत्स्योत्पादन वाढीसाठी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचनाही राणे यांनी यावेळी दिल्या.

प्लास्टिक मुक्त कोळीवाडा या योजनेस गती द्यावी. मत्स्योत्पादकांना स्थानिक बाजारपेठेत उत्पादन विक्रीसाठी प्रोत्साहन द्यावे. अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त कराचा विचार करता मत्स्योत्पादन स्थानिक तसेच देशांतर्गत बाजारात विक्री करणे हा एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी यामधील कंपन्यांसोबत चर्चा करावी. मत्स्योत्पदकांमध्ये जागृती करावी. एआय(AI) च्या वापराबाबत सर्व सहायक आयुक्त यांना प्रशिक्षण द्यावे. मत्स्य आणि कोळंबी खाद्य महोत्सवाचे आयोजन करावे. कोळंबीची विक्री देशात वाढवण्यासाठी एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचनाही राणे यांनी दिल्या.

मत्स्य कोळंबी महोत्सव आयोजित करावा

  • राज्यात यंदाच्या हंगामात मत्स्योत्पादन ४७% वाढले असून, पुढील हंगामात आणखी वाढीसाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील राहावेत, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
  • तलावातील गाळ काढल्यास गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते; त्यामुळे जलसंपदा विभागाशी समन्वय करून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना मंत्री राणेंनी दिली.
  • प्लास्टिक मुक्त कोळीवाडा योजनेला गती देण्याबरोबरच स्थानिक व देशांतर्गत बाजारपेठेत मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, एआय प्रशिक्षण द्यावे आणि मत्स्य-कोळंबी खाद्य महोत्सव आयोजित करावा, असे सल्ले मंत्री राणेंनी दिले.

Web Title: Minister Rane suggests time bound action plan to increase fish production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.