बाजारपेठ पुन्हा गजबली ! कणकवली बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:12 IST2020-09-29T15:09:17+5:302020-09-29T15:12:22+5:30
कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये २० ते २७ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तो कालावधी संपल्यामुळे सोमवारपासून कणकवली व लगतच्या गावांमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे. त्याचबरोबर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

कणकवली शहर जनता कर्फ्यू नंतर पुन्हा गजबजले.
सुधीर राणे
कणकवली : कणकवली शहरासह लगतच्या गावांमध्ये २० ते २७ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. तो कालावधी संपल्यामुळे सोमवारपासून कणकवली व लगतच्या गावांमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ रस्त्यावर दिसत आहे. त्याचबरोबर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
जनता कर्फ्यूचा कालावधी संपल्याने सोमवार पासून कणकवली पुन्हा गजबजली. जनता कर्फ्युच्या कालावधीत निर्मनुष्य झालेल्या रस्त्यावर आता वर्दळ दिसू लागली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील काही विशिष्ट भागात गर्दी दिसून येत होती.
वारंवार होणाऱ्या लोकडाऊनला आता नागरिक ,व्यापारी कंटाळले असून प्रत्येक व्यक्तीने आपल्याबरोबरच इतरांची काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाने घालून दिलेले नियम पाळावे . अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई - गोवा महामार्गावरही गाड्यांचे प्रमाण सोमवारी वाढले होते. रिक्षा, चारचाकी , दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करीत होती.
दरम्यान, कणकवली नगरपंचायत प्रशासनासमोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे खरे आव्हान उभे आहे. विना मास्क असलेल्यांवर कारवाई, सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी प्रयत्न व दुकानांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नगरपंचायतीने प्रयत्न करावेत,असे आवाहन विविध स्तरातील नागरिकांकडून केले जात आहे.
शासकीय कार्यालयात गर्दी !
जनता कर्फ्यू संपल्यानंतर सोमवारी शासकीय कार्यालयेही विविध कामासाठी आलेल्या अभ्यागतांच्या गर्दी मुळे गजबजली होती. गेले आठ दिवस शासकीय कार्यालये पण शांत होती. मात्र, सोमवारी या कार्यालयांमध्ये गर्दी पहायला मिळाली.