महायुती भक्कम, आरोप-प्रत्यारोप फक्त निवडणुकीपुरते - रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:15 IST2025-12-06T18:14:49+5:302025-12-06T18:15:31+5:30
लवकरच महायुतीतील नेते भूमिका ठरवणार

महायुती भक्कम, आरोप-प्रत्यारोप फक्त निवडणुकीपुरते - रवींद्र चव्हाण
सावंतवाडी : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. हे निवडणुकीत होणे स्वाभाविक आहे. पण आता राज्यातील व केंद्रातील सरकार योग्य पद्धतीने चालले पाहिजे. अलीकडेच महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले. त्यांनी घडलेल्या घटनांवर पडदा टाकला पाहिजे. आता विषय जास्त वाढवू नये, असे त्यांचे मत आहे. आम्हीही याच मताचे असून, या सर्व घटनांवर पडदा टाकला जाणार आहे. लवकरच नागपूर अधिवेशनादरम्यान महायुतीतील नेते एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले.
ते शुक्रवारी सावंतवाडीत आले असता येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सावंतवाडीतील धुमश्चक्रीवर निवडणुकीत असे प्रकार घडत असतात. त्यामुळे निवडणुका संपल्यावर हे सगळे विसरून गेले पाहिजे, असे स्पष्ट केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम सावंत भोसले, रवींद्र मडगावकर, मनोज नाईक, भाजप युवा नेते विशाल परब, श्रद्धा भोसले, बबन साळगावकर, ॲड. अनिल निरवडेकर, सुधीर आडिवरेकर, नीलम नाईक, दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, राजू बेग, रूजुल पाटणकर, मेहरून शेख, प्रतीक बांदेकर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकास केला असून, या विकासकामांची माहिती चव्हाण यांनी दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांवर भाष्य केले. निवडणुकीत अशा घटना घडत असतात. आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. पण निवडणुका संपल्या की कार्यकर्त्यांनी सर्व विसरून जायचे असते.
पक्षप्रवेशावरून शिंदेसेना व भाजप यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांत कार्यकर्ते येणे-जाणे सुरू होते. काही महत्त्वाचे पदाधिकारी या ना त्या पक्षात गेल्याने थोडासा दुरावा आणखी वाढला होता. पण आता हा दुरावा कमी करण्यासाठी आपण काम केले पाहिजे, असे सांगितले.
निवडणूक संपली, विषय संपला
सावंतवाडीत भाजप-शिंदेसेनेच्या राड्यावर चव्हाण म्हणाले, निवडणूक संपली विषय संपला. त्यामुळे आता वाद वाढवण्यात काही अर्थ नाही.