Sindhudurg: माझ्यावर गुन्ह्यांची चौकशी करा; वैभव नाईक यांचे नीलेश राणे यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:16 IST2025-04-17T17:15:38+5:302025-04-17T17:16:56+5:30
अंतर्गत वादामुळे बिडवलकर खून प्रकरण उघडकीस

Sindhudurg: माझ्यावर गुन्ह्यांची चौकशी करा; वैभव नाईक यांचे नीलेश राणे यांना आव्हान
कुडाळ : पालकमंत्री तुमचे बंधू आहेत, तुमचे वडील खासदार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा मला पोलिस ठाण्याला घ्या आणि माझ्यावर कोणकोणते गुन्हे आहेत त्याची एकदा चौकशी करा. असे आव्हान माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार नीलेश राणे यांना दिले. आमदार नीलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर एका व्हिडीओ क्लिपद्वारे केलेल्या आरोपांना नाईक यांनी उत्तर दिले.
वैभव नाईक म्हणाले, बिडवलकर खून प्रकरण हे बाहेर कसे आले हा खरा प्रश्न आहे. शिंदेगटाच्या दोन गटांतील अंतर्गत वादामुळे हे प्रकरण उजेडात आले. खून झाला हे एका गटाला माहीत होते. सिद्धेश शिरसाट हा नामचीन दारू व्यापारी आहे. गेल्या दीड वर्षातच हा सक्रिय कसा झाला. नारायण राणेंच्या विजयानंतर याच्याच दारूच्या पैशाने विजयोत्सव साजरा केला. मग अशा गुंडांना कोण पाठीशी घालतोय, याचा आका कोण आहे हा आमचा प्रश्न आहे.
नाईक पुढे म्हणाले, हे प्रकरण आम्ही लावून धरल्यानंतर त्याच्यावर राज्यस्तरावर आवाज उठवण्यात आला. आम्ही दहा वर्षांत जिल्ह्याची कधी बदनामी होऊ दिली नाही. जिल्ह्याची दहशत व बदनामी कोण करतयं हे लोकांना माहीत आहे. मला जर हे प्रकरण तेव्हाच कळले असते तर मी तेव्हाच आवाज उठवला असता.
सिद्धेश शिरसाट आपला कार्यकर्ता नव्हताच
सिद्धेश शिरसाट हा गेल्या पंधरा वर्षांत कधीही माझा कार्यकर्ताच नाही, त्याच्यासोबत माझा एकही फोटो नाही असे सांगून वैभव नाईक यांनी सिद्धेश शिरसाटशी संबंध असलेले आरोप फेटाळले. खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी तो शिंदेगटात गेला त्याचा नीलेश राणे व त्यांच्या समर्थकांशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे त्याला कोणाचा पाठिंबा आहे हे लोकांना माहीत आहे.