Sindhudurg ZP Election 2026: मालवणमध्ये महायुतीत अंतर्गत संघर्ष, भाजपची अस्तित्वाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:28 IST2026-01-23T16:27:06+5:302026-01-23T16:28:43+5:30
उद्धवसेनेच्या परफॉर्मन्सकडे लक्ष

संग्रहित छाया
संदीप बोडवे
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत जबरदस्त पीछेहाट झालेल्या मालवण भाजपला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. सर्वत्र भाजप आणि शिंदेसेना महायुती असली तरीही अनेक ठिकाणी युतीत ‘तू-तू, मैं-मैं’ पाहावयास मिळते. मालवणमध्येही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही.
विकास निधीत डावलणे आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मालवण भाजपने घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यातूनच पुढे कुरघोडीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुती किती एकदिलाने काम करणार आहे, यावरच युतीचे यश अवलंबून राहणार आहे.
भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील असे घोषित केले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे भाजपची, तर आमदार नीलेश राणे यांच्याकडे शिंदेसेनेची जबाबदारी राहणार आहे. खासदार नारायण राणे या निवडणुकांचे नेतृत्व करत असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे दोन्ही नेते मालवणसाठी स्थानिक असल्यामुळे शिंदेसेना त्यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. याउलट भाजपला थोडा संघर्ष करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत; परंतु भाजपाचे नेते खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडे भाजपची धुरा आहे.
जागावाटपात मालवणात भाजप बॅकफूटवर
महायुतीच्या जागावाटपात मालवणमधून भाजपला मसुरे मर्डे ही एकच जिल्हा परिषद देण्यात आली आहे. तर उर्वरित आडवली मालडी, आचरा, सुकळवाड, पेंडूर, वायरी भूतनाथ हे जिल्हा परिषद मतदार संघ शिंदेसेनेच्या वाट्याला आले आहेत. पंचायत समितीमधील जागावाटपात भाजपला वायरी भूतनाथ, कोळंब, चिंदर, आडवली मालडी, सुकळवाड, वराड हे, तर शिरवंडे, आचरे, मसुरे, मर्डे, पोईप, पेंडूर आणि कुंभारमाठ हे पंचायत समिती मतदारसंघ शिंदेसेनेला मिळाले आहेत. मालवणमध्ये नवख्या शिंदेसेनेने सहापैकी जिल्हा परिषदेच्या पाच जागा बळकावल्यामुळे तालुक्यात भाजप बॅकफूटवर पडली आहे.
उद्धवसेनेच्या परफॉर्मन्सकडे लक्ष
मागील विधानसभा निवडणुकीत आडवली मालडी, आचरा, पोइप, गोळवण या जिल्हा परिषद मतदारसंघांत उद्धवसेनेने मोठ्या मतांचा आकडा मिळविला होती. तर देवबाग, पेंडूर या जिल्हा परिषद मतदारसंघांत उद्धवसेनेकडून सन्मानजनक कामगिरी दिसली होती. उद्धवसेनेचा पारंपरिक मतदार टिकून ठेवण्यात माजी आमदार वैभव नाईक आणि तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांना यश आले होते. उद्धवसेनेच्या तालुका नेतृत्वाकडे असलेले अधिकार आणि भाजपा शिंदेसेनेतली असलेली ‘तू-तू, मैं-मैं’ मालवणात उद्धवसेनेसाठी फायदेशीर ठरणार काय? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.