Sindhudurg: धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट, संशयिताच्या पत्नीचा आरोप; म्हणाली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:11 IST2025-07-04T16:10:31+5:302025-07-04T16:11:15+5:30
धारगळ ॲसिड हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट

संग्रहित छाया
दोडामार्ग : धारगळ गोवा येथे महाविद्यालयीन युवकावर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. आपल्या मुलीला तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवून जखमी वृषभ शेट्ये व तिची आई विद्या शेट्ये यांच्याकडून ब्लॅकमेल केले जात होते. त्या नैराशेतूनच तिने आत्महत्या केली. त्यामुळे या दोघांवरही माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल आणि अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल केल्याच्या गुन्ह्याखाली ती अल्पवयीन असल्याने पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार ॲसिड हल्लाप्रकरणी गोवापोलिसांच्या अटकेत असलेला संशयित आरोपी नीलेश देसाईंची पत्नी नेहा देसाई हिने दोडामार्ग पोलिसांकडे केली आहे.
तसेच आपली मुलगी निलाक्षी व वृषभ हिचे व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम संभाषण, अश्लील फोटो व व्हिडीओ पोलिसांना दिले. शिवाय आपल्या पतीला केवळ संशयावरून अटक केली आहे; पण या हल्ल्याशी त्यांचा काहीही संबंध नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
आपल्या मुलीचे आणि वृषभ शेट्ये याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात बिनसल्याने आपली मुलगी निलाक्षी हिने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस वृषभच जबाबदार असल्याचा राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्यासाठी नीलेश देसाई याने तीन दिवसांपूर्वी वृषभवर धारगळ येथे ॲसिड हल्ला केला होता. त्यांनतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेने संपूर्ण गोवा राज्यात खळबळ उडाली होती. सध्या तो पेडणे पोलिसांच्या अटकेत आहे. मात्र, आता संशयितांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा संशयिताची पत्नी तिच्या नातेवाइकांसह पोलिस ठाण्यात येऊन धडकली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस उपस्थित होते.
यावेळी तिने पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याशी चर्चा केली. माझा पती निर्दोष आहे. त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. त्याला केवळ संशयावरून अटक करण्यात आली असल्याचे तिने सांगितले. माझी मृत मुलगी निलाक्षी व वृषभ शेट्ये या दोघांचे प्रेमसंबंध होते. वृषभने लग्नाचे आमिश दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्याचे व्हिडीओ व फोटो काढून स्वतःकडे ठेवले.
वृषभ करत होता ब्लॅकमेल
वृषभच्या आई-वडिलांना हे नाते मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला, तर वृषभने आपल्या घरच्यांचा लग्नाला विरोध आहे. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणार नाही. मात्र, तरीसुद्धा तुला माझ्याशी शरीर संबंध ठेवावे लागतील अन्यथा मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करीन, असे सांगून तिला ते पाठवून ब्लॅकमेल करीत होता.
मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करू
त्यामुळे या ब्लॅकमेलिंगमुळेच माझ्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. परिणामी, वृषभ शेष्ट्ये व तिच्या आईवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व पॉस्कोअंतर्गत अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार केली. यावर पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपण कायदेशीर मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.