Sindhudurg: आंब्याच्या बागेत अर्भक सापडले, आशा स्वयंसेविकाच काही काळ बनली माय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:14 IST2025-06-21T15:13:54+5:302025-06-21T15:14:35+5:30

नाळही होती शिल्लक.., अज्ञात आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

Infant found in mango orchard in Malvan Sindhudurg, Asha volunteer became mother for some time | Sindhudurg: आंब्याच्या बागेत अर्भक सापडले, आशा स्वयंसेविकाच काही काळ बनली माय

Sindhudurg: आंब्याच्या बागेत अर्भक सापडले, आशा स्वयंसेविकाच काही काळ बनली माय

मालवण : कुंभारमाठ माळरानावरील एका आंब्याच्या बागेत स्त्रीजातीचे नवजात अर्भक शुक्रवारी सकाळी सापडून आले. पोलिस पाटील विठ्ठल बावकर यांनी तातडीने पोलिस यंत्रणेला माहिती दिल्यानंतर नवजात अर्भक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कुंभारमाठ आणि परिसरातील गावांतील गरोदर मातांची आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन त्यांच्या घरी जात चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात नवजात अर्भकाला आणल्यानंतर त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या बालकाला आवश्यक असणारे सर्व उपचार करत मायेचा आधार दिला. बाळाला डॉक्टरांच्या सूचनेनंतर चमचा मधून दूधही पाजण्यात आले होते. मात्र त्याला उपचाराची आवश्यकता असल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. नवजात अर्भक सापडल्यापासून जिल्हा रुग्णालयात नेण्यापर्यंतच्या प्रवासात आशा स्वयंसेविकाच तिची माता बनली होती. आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे आशा स्वयंसेविकांकडून त्या अर्भकाची काळजी घेतली जात होती.

नाळही होती शिल्लक ..

स्त्रीजातीचे अर्भक पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास करलकर यांच्या आंबा बागेत रडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी पोलिस पाटील बावकर गेले. बालकाच्या अंगावर नाळ तशीच शिल्लक ठेवण्यात आली होती. अंगावर गवत लावलेले होते. त्याठिकाणी असलेल्या कांबळी यांच्याकडून ओढणी घेऊन त्या बालकाच्या अंगाभोवती गुंडाळण्यात आली. त्यानंतर पेडणेकर यांच्या कारने बालकास घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी नवजात बालकावर सुश्रूषा केली. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली होती.

पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल

कोणीतरी अज्ञात पालकांनी त्यांचे नुकत्याच जन्मलेल्या स्त्रीजातीच्या नवजात अर्भकास त्यांच्यावर त्या अर्भकाची देखभालीची कायदेशीरपणे जबाबदारी असताना त्या बालकाचा कोणत्यातरी कारणास्तव संपूर्णपणे परित्याग करून त्याला कुंभारमाठ म्हाडा कॉलनी येथील आंबा बागेतील मोकळ्या जागेत टाकून दिल्याबद्दल त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व सुप्रिया पवार करीत आहेत.

आशा स्वयंसेविकांचे महत्त्वपूर्ण योगदान

ग्रामीण रुग्णालयात नवजात अर्भक सापडल्यानंतर कुमारमाठ परिसरातील आशा स्वयंसेविका अश्विनी नेवाळे आणि प्रणिता भोगावकर यांनी बाळाला आईची माया देत आधार दिला होता. तसेच ज्याठिकाणी सापडून आले होते त्याठिकाणी समिधा कांबळी यांनीही तातडीने आंबा बाग मालकांना माहिती देत त्यांच्या बागेत लहान मूल रडत असल्याचे कळविले होते. आंबा बाग मालक रूपेश करलकर यांनीही गांभीर्याने घेत पोलिस विठ्ठल बावकर यांना माहिती दिली. यामुळे या बाळाला तातडीने उपचार करता येणे शक्य झाले. कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर यांनीही यासाठी आवश्यक सहकार्य करत बाळाला रुग्णालयात दाखल करणे व पुन्हा उपचारासाठी नेईपर्यंत जबाबदारीने थांबून मदत केली.

Web Title: Infant found in mango orchard in Malvan Sindhudurg, Asha volunteer became mother for some time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.