लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:11 IST2025-08-06T14:11:08+5:302025-08-06T14:11:55+5:30
गेल्या महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई

लाकडाच्या भुसामधून ३७ लाखांची अवैध दारू वाहतूक, दोघांवर गुन्हा; वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर कारवाई
वैभववाडी : करूळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीची दारू पकडली. याप्रकरणी दारूसह ५९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार ५ रोजी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या करण्यात आली. कंटेनरमधून लाकडाचा भुसा वाहतुकीचा दिखावा करून ११०० बॉक्स दारू वाहतूक सुरू होती. गेल्या महिनाभरातील ही चौथी मोठी कारवाई आहे.
करूळ तपासणी नाक्यावर हवालदार रणजित सावंत, पोलिस शिपाई समीर तांबे, हाके हे कार्यरत होते. वाहनांची तपासणी सुरू असताना पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडीहून गगनबावड्याच्या दिशेने निघालेला कंटेनर (क्रमांक आरजे ५३, जी/ए ०५५२) नाक्यावर आला. पोलिसांनी चालक नवीन सुरेश कुमार (२९, रा. कदम, ता. भिवानी, जि. भिवानी-हरियाणा) याच्याकडे कंटेनरमधील मालाविषयी विचारणा केली असता त्याने ‘बायोमास फ्युअल क्रिक्स’ असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे पावतीची विचारणा केली असता तो संदर्भहिन बोलू लागला. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वीरेंद्र भरत सिंग (४२ रा. हजमपूर, ता. हंसी, जि. हिंसार- हरियाणा) याच्याकडे विचारणा केली. मात्र त्याच्याकडूनही समर्पक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कंटेनर उघडण्यास सांगितला.
कंटेनर उघडला असता पोलिसांना सुरुवातीला लाकडाचा भुसा भरलेल्या सफेद रंगाच्या पिशव्या आढळल्या. त्यातील काही पिशव्या बाजूला केल्यावर कंटेनरच्या आत लोखंडाला प्लायवूड बसविलेला स्वतंत्र मोठा कप्पा दिसला. तो उघडल्यावर पोलिस चक्रावून केले. पूर्ण कप्प्यात दारूचे बॉक्स आढळून आले. त्यामुळे याची माहिती पोलिस ठाण्यात दिल्यानंतर प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक जी.जी. माने, पोलिस शिपाई हरीष जायभाय नाक्यावर पोहोचले. त्यानंतर हा कंटेनर पोलिस ठाण्यात आणला.
कंटेनरमधील बॉक्सची मोजणी करण्यात आली. साधारणपणे दोन तास ही प्रकिया सुरू होती. कंटेनरमध्ये दारूचे ११०० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ वेगळे बॉक्स होते. ही दारू ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीची असून कंटेनरसह ५९ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
सर्वात मोठी कारवाई
वैभववाडी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. संभाजी चौक, कुसुर पिंपळवाडी, करूळ तपासणी येथे दारू पकडली होती. त्यानंतर ही चौथी कारवाई असून आतापर्यंतची वैभववाडी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई आहे.