देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती-भीमशक्तीची एकजूट आवश्यक, नितेश राणे यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:36 IST2024-08-12T13:35:43+5:302024-08-12T13:36:04+5:30
'संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही नक्की काढू'

देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती-भीमशक्तीची एकजूट आवश्यक, नितेश राणे यांचे आवाहन
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक मावळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप मानतो. संविधान बदलणार अशी आवई उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही एक चपराक आहे. भारतात फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चालणार आहे. त्यामुळे संविधान जागर यात्रेच्या निमित्ताने आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या. सध्याच्या स्थितीत आपला देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्तीची एकजूट आवश्यक आहे. हे त्यांना पटवून द्या, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी संविधान जागर यात्रेनिमित्त आयोजित प्रबोधन सभेत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. वाल्मीक निकाळजे, कोकण समन्वयक नितीन मोरे, यात्रा सभा अध्यक्ष विकास गवाळे, योजनाताई ठोकळे, स्नेहाताई भालेराव, अशोक गायकवाड, अंकुश जाधव, आकाश आंबोरे, संदेश जाधव, अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, गुणाजी जाधव, सिद्धार्थ जाधव आदीसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, कणकवलीत संविधान जागर यात्रेचे आगमन झाले आहे. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे विचार मांडणे हा योगायोग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत, कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. त्यामुळे संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे आम्ही नक्की काढू.
संविधानाचे रक्षण करू अशी शपथ घेऊ. हेच या संविधान जागर यात्रेचे यश आहे. निवडणूक तोंडावर असताना कोणीतरी आपल्या गावात, वाडीत येऊन सभेत सांगेल की संविधान बदलणार आहेत. त्यामुळे तुमच्या मनात भीती घालेल. आजची संविधान जागर सभा या भूलथापेला चोख उत्तर आहे.
..म्हणून बांगलादेशमध्ये अराजक
बांगलादेशमध्ये बाबासाहेबांचे संविधान नाही म्हणून आज तिथे अराजकता माजली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत का लटकले? राहुल गांधी यांना संविधानात किती पाने आहेत? याचे उत्तर लोकसभेत देता आले नाही. अशा राहुल गांधींच्या उमेदवारांना आपण मते देणार आहोत काय? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.