मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी
By Admin | Updated: July 14, 2014 00:01 IST2014-07-13T23:59:34+5:302014-07-14T00:01:51+5:30
फणसवाडीतील धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला

मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी
दोडामार्ग : वर्षा पर्यटनासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले मांगेली गाव रविवारी हजारो पर्यटकांनी फुलून गेले. येथील फणसवाडी धबधब्यावर मोठ्या प्रमाणात वर्षा पर्यटनसाठी आलेल्या पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’ गर्दी केली होती.
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसलेले मांगेली गाव वर्षा पर्यटनासाठी अल्पावधीतच नावारुपास आले आहे. निसर्गाचे अद्भूत चमत्कार खच्चून भरलेल्या मांगेलीमधील वातावरणही आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारे असल्याने गेल्या चार वर्षांपासून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मांगेली फणसवाडी येथील धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे गोवा आणि कर्नाटक राज्यातील पर्यटक पावसाळ्यात या धबधब्याखाली आंघोळ करून वर्षा पर्यटनाचा आस्वाद लुटण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.
यंदाच्या हंगामात पावसाने दीड महिन्यांपासून दडी मारल्याने गेल्या चार दिवसांपूर्वीच मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. त्यामुळे मांगेली फणसवाडीतील धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्यानंतर आज पहिल्याच रविवारी पर्यटकांनी मांगेलीमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. गोवा, महाराष्ट्र तसेच नजीकच्या कर्नाटक राज्यातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी उशीरापर्यंत धबधब्यास्थळी पर्यटक जावून स्नानाचा आनंद लुटताना दिसत होते. (प्रतिनिधी)