Sindhudurg: तिलारी घाट परिसरात पावसाचा हाहाकार; रस्त्यावर पाणी, काही काळ वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:34 IST2025-06-25T15:32:45+5:302025-06-25T15:34:11+5:30

अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy rains in Tilari Ghat area Sindhudurg Water on roads, traffic disrupted for some time | Sindhudurg: तिलारी घाट परिसरात पावसाचा हाहाकार; रस्त्यावर पाणी, काही काळ वाहतूक ठप्प

Sindhudurg: तिलारी घाट परिसरात पावसाचा हाहाकार; रस्त्यावर पाणी, काही काळ वाहतूक ठप्प

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील लहान पूल, काॅजवे पाण्याखाली गेल्याने शिवाय पर्यायी रस्ते वाहून गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तिलारी घाटाच्या पायथ्याशी डोंगरातील चिखल आला आहे, तर येथील राणेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी वाहतूक ठप्प झाली, तर साटेली भेडशी येथील एक घर व आस्थापनेवर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. एकंदरीत तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे.

दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. मात्र, मंगळवारी पावसाचा अधिकच जोर धरला. पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्यातील लहान पूल, काॅजवे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम करताना निर्माण केलेले पर्यायी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

साटेली-भेडशी वरचा बाजार येथे एक झाड घर व आस्थापनेवर कोसळले. यात पत्रे फुटले. झाड पडत असताना आवाज आल्याने सर्वांनी तेथून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले. मात्र घर व आस्थापनाचे यात मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी कटरच्या साहाय्याने ते झाड कापले व जेसीबीच्या साहाय्याने ते बाजूला केले.

Web Title: Heavy rains in Tilari Ghat area Sindhudurg Water on roads, traffic disrupted for some time