सावंतवाडी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील काही गावांना जोरदार फटका बसला असून, बेळगाव कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक माडखोल-धवडकी परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास ठप्प झाली होती.बांदा शहरातही पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन अनेक ठिकाणी पूरस्थितीजन्य परस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी सकाळी पाणी ओसरले होते. मात्र, काही गावांत नुकसानही झाले असून, त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.सावंतवाडी तालुक्यात मंगळवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. बुधवारी तर पावसाने हाहाकार उडवला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दुपारनंतर बांदा शहर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले होते. आळवाडी-कट्टा कॉर्नर हा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.सतर्क राहावे, तसेच अत्यावश्यक काम वगळता घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. तेरेखोल नदीचे पाणी पात्राबाहेर आले आल्याने नदीकाठच्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली.बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली-सावंतवाडी हा राज्यमार्ग माडखोल धवडकी येथे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री नऊ वाजल्यापासून तब्बल दीड तास हे पाणी राज्यमार्गावर होते. सावंतवाडीहून बेळगाव-कोल्हापूर, तसेच आंबोलीवरून गोव्याकडे जाणारा मार्ग ठप्प झाल्याने वाहने अडकून पडली होती. आपत्कालीन पथकाला माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. गुरुवारी थोडी पाऊस कमी झाल्याने पूरस्थिती ओसरली असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
Sindhudurg: सावंतवाडी तालुक्यात पावसाने हाहाकार; आंबोली मार्गावर पाणी, बांदा शहरात पूरसदृश स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:15 IST