Sindhudurg: अतिवृष्टीचा फटका, धामापूर-मोगरणे येथे घरावर दरड कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:28 IST2025-05-24T17:28:32+5:302025-05-24T17:28:58+5:30
चौके : सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास धामापूर, मोगरणे-जाधववाडी ...

Sindhudurg: अतिवृष्टीचा फटका, धामापूर-मोगरणे येथे घरावर दरड कोसळली
चौके : सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास धामापूर, मोगरणे-जाधववाडी येथील जयंत सदानंद ठोंबरे यांच्या राहत्या घरावर दरड कोसळून घराच्या मागील पडवीच्या भिंती आणि कौलारू छप्पर पूर्णपणे कोसळले. यात ठोंबरे यांचे सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, ज्यावेळी दरड कोसळून घराच्या भिंती आणि छप्पर कोसळले त्यावेळी त्या पडवीमध्ये ठोंबरे यांची गाय बांधलेली होती. सुदैवाने या दुर्घटनेत गायीचा जीव वाचला. मात्र तिला गंभीर दुखापत झाली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच धामापूर सरपंच मानसी परब आणि महेश परब यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या दुर्घटनेची माहिती दूरध्वनीवरून शिंदेसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आमदार नीलेश राणे यांना दिली.
यावर दत्ता सामंत यांनी तातडीने पंचनामा करण्याची सूचना केली असून आमदार नीलेश राणे यांनी लवकरात लवकर ठोंबरे यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन सरपंच मानसी परब यांना दिले, अशी माहिती महेश परब यांनी दिली.